मुंबई : राज्य कुमार तसेच किशोर कबड्डी स्पर्धेतील वयचोरी टाळण्यासाठी राज्य कबड्डी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हा संघटनांना पाठवलेल्या पत्रात वयचोरी करणारा खेळाडू, तसेच संबंधित जिल्ह्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याचा कठोर इशारा दिला आहे.
राज्य किशोर (16 वर्षांखालील) कबड्डी स्पर्धा 23 जानेवारीपासून तीन दिवस होणार आहे. ही स्पर्धा नगरला होणार आहे, तर कुमार स्पर्धा (20 वर्षांखालील) बीड किंवा अंबेजोगाईला फेब्रुवारीच्या पूर्वार्धात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्पर्धांच्यावेळी कायम वयचोरीचा आरोप केला जातो. काही वर्षांपूर्वी ठाण्याने खोटे आधार कार्डही सादर केले जाते, हे दाखवले होते.
आता राज्य कबड्डी संघटनेने सर्व जिल्हा संघटनांना वयोगटाच्या या दोन्ही स्पर्धेबद्दल पत्र पाठवले आहे. त्यानुसार खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना वयाचा सबळ पुरावा आणणे आवश्यक आहे, असे सांगितले आहे. त्याचबरोबर छाननीच्यावेळी एखादा पुरावा खोटा आढळल्यास त्या खेळाडू, तसेच संबंधित जिल्हा संघावर तीन वर्षांची बंदी घालण्यात येईल, असे सांगितले आहे.
स्पर्धक खेळाडूंसाठी आधार कार्ड सक्तीचे आहे, त्याचबरोबर त्यांना एखादा तरी शैक्षणिक पुरावा देण्याची गरज आहे. या स्पर्धेतील वाढती वयचोरी टाळण्यासाठी इशारा दिला आहे. काही संघांना आपल्या संघात जास्त वयाचे खेळाडू असल्याची जाणीव असते. त्यातील एखादा खेळाडू दोषी आढळल्यास आम्ही कमी खेळाडूंनीशी खेळतो, असे सांगितले जाते. जिल्हा संघांनी संघनिवड करतानाच वयचोरी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच प्रामुख्याने अपेक्षा असल्याचे कबड्डी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
|