
CWG 2022 : अमित, नीतू, निखतची सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल
बर्मिंगहॅम, ता. ६ :
भारतीय बॉक्सर्ससाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील शनिवारचा दिवस आनंददायी ठरला. पुरुषांच्या गटात अमित पांघल याने; तर महिलांच्या गटात नीतू घंघास व निखत झरीन यांनी अंतिम फेरी गाठली. यामुळे आता या तीन बॉक्सर्सचे किमान रौप्यपदक पक्के झाले आहे. भारतीय या बॉक्सर्सनी सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. (Amit Panghal nikhat Zareen Reached Final In Boxing Commonwealth Games 2022)
अमितने ४८ ते ५१ किलो वजनी गट प्लायवेट प्रकाराच्या लढतीत झाम्बियाच्या पॅट्रिक चिनएम्बा याला ५-० अशा फरकाने धूळ चारली आणि अंतिम फेरीत वाटचाल केली. पहिल्या फेरीनंतर अमित २-३ अशा फरकाने पिछाडीवर होता, पण अखेरच्या क्षणांमध्ये त्याने आपला खेळ उंचावला व जजेसकडून त्याला महत्त्वाचे गुण देण्यात आले. अखेर तो विजयी झाला. आता उद्या खेळवण्यात येणाऱ्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत अमितसमोर इंग्लंडच्या कायरॅन मॅकडोनाल्डचे आव्हान असणार आहे.
नीतूच्या झंझावाती खेळासमोर कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोनचा निभाव लागला नाही. महिलांच्या ४५ ते ४८ किलो वजनी गटाच्या लढतीत नीतूच्या ठोशांसमोर प्रियांका गारद झाली. अखेर रेफ्रींनी ही लढत थांबवली. नीतू अंतिम फेरीत पोहोचली. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत तिला यजमान देश इंग्लंडच्या डेमी रेसझ्तान हिचा सामना करावयाचा आहे.
निखतने महिलांच्या ५० किलो वजनी गटातील लाईट फ्लाय प्रकारात इंग्लंडच्या सवान्नाह सबली हिच्यावर अगदी आरामात विजय साकारला. निखतने या लढतीत ५-० अशा फरकाने बाजी मारली. आता अंतिम फेरीच्या लढतीत उत्तर आयर्लंडच्या कार्ली मॅकनॉल हिच्याशी निखतला दोन हात करावे लागणार आहेत.
जास्मिनला ब्राँझपदक
भारताची महिला बॉक्सर जास्मिन लॅमबोरिया हिला ६० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठता आली नाही. इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनकडून तिला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. रिचर्डसनने या लढतीत ३-२ अशा फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत घोडदौड केली. जास्मिनला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
Web Title: Amit Panghal Nikhat Zareen Reached Final In Boxing Commonwealth Games 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..