esakal | लिओनेल मेस्सीच्या पेनल्टीमुळे अर्जेंटिनाचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

लिओनेल मेस्सीच्या पेनल्टीमुळे अर्जेंटिनाचा विजय

लिओनेल मेस्सीच्या पेनल्टीमुळे अर्जेंटिनाचा विजय

sakal_logo
By
पीटीआय

ब्यूनोस आयर्स - लिओनेल मेस्सीने पेनल्टी किकवर केलेल्या गोलाच्या जोरावर अर्जेंटिनाने विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत चिलीचा १-० असा पराभव केला. या विजयामुळे रशियात होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याच्या त्यांच्या आशांना बळकटी मिळाली आहे. या गोलाबरोबर मेस्सीने युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील अपयशाचीही परतफेड केली.

चिलीविरुद्धच्या या सामन्यात १६ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या एंजेल डी मारियाला चिलीच्या खेळाडूंनी अवैधरीत्या पाडले, त्यामुळे अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. या संधीचे मेस्सीने निर्णायक गोलात रूपांतर केले. गतविश्‍वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत धडक मारणाऱ्या अर्जेंटिनावर यंदा पात्रता स्पर्धेतच बाद होण्याचे संकट आले होते. आता या विजयामुळे दहा संघांमध्ये त्यांनी २२ गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 

या पात्रता स्पर्धेत आमच्याकडून चांगली कामगिरी होत नव्हती; परंतु महत्त्वाच्या सामन्यात मिळालेल्या विजयाचे मोल मोठे आहे, असे समाधान अर्जेंटिनाचे प्रशिक्षक एडगार्डो बाऊझा यांनी व्यक्त केले. एका सामन्याच्या बंदी असलेल्या अर्तुरो विदालची उणीव चिलीला भासली. हा सामना बरोबरीत सुटला असता तरी त्यांना फटका बसला नसता.  

यंदाच्या मोसमातच झालेल्या युरो अंतिम सामन्यात आणि त्या अगोदरच्याही युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीची पेनल्टी वाया गेली होती, त्यामुळे त्याच्यावर मोठे दडपण होते; परंतु त्याने सर्व अनुभव पणास लावून हा गोल केला. यंदाच्या युरो अंतिम सामन्यातील अपयशामुळे मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला गुडबाय केले होते; परंतु देशवासीयांच्या इच्छेमुळे त्याने पुन्हा खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मेस्सीच्या या निर्णायक गोलचा अपवाद वगळता अर्जेंटिनाला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली होती; परंतु निकोलस ओटामेंदीने मेस्सीच्याच फ्रि किकवर मारलेला चेंडू गोलजाळ्याच्या वरतून गेला. अपेक्षेप्रमाणे चिलीच्या बचावपटूंनी मेस्सीला रोखण्यावरच भर दिला होता. तरीही त्याने मार्कोस रोजाच्या पासवर गोल करण्याचा एक प्रयत्न केला होता.

ब्राझीलचा मोठा विजय
पौलिन्होच्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर ब्राझीलने उरुग्वेचा ४-१ असा पराभव करून ३० गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. या सामन्यात पहिला गोल उरुग्वेने केला होता. ब्राझीलचा गोलरक्षक अलीसनने उरुग्वेच्या एडिंसन कॅव्हेनीला गोलक्षेत्रात पाडले, त्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर उरुग्वेने गोल केला. १० मिनिटांनंतर पौलिन्होने गोल करून ब्राझीलला बरोबरी साधून दिली या गोलासह त्याने हॅटट्रिक केली. ब्राझीलकडून चौथा गोल नेमारने केला.

loading image
go to top