एक लढा...पाण्यातला! सोशल मीडियाने जिंकून दिलेला!

Article on cheating in swimming competition by Lovely University in Jalandhar
Article on cheating in swimming competition by Lovely University in Jalandhar

चांगल्या खेळाडूंवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एका जलतरणपटूने केलेले एक ट्विट....हेच ट्विट गल्लीपासून दिल्लीपर्यंत फिरले आणि त्यातून पेटले ते पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील फगवाडा येथे असलेल्या लव्हली युनिव्हर्सिटीच्या जलतरण तलावाचे पाणी! इथल्या शांतीदेवी मित्तल स्पोर्टस् काँप्लेक्समध्ये आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते.

प्रत्यक्षात जलतरण स्पर्धांच्या ठिकाणी खूपच 'अनप्रोफेशनल' खेळ सुरु होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच सहभागी जलतरणपटू अस्वस्थ होते. या सगळ्यावर कडी झाली ती दोन प्रकरणांमुळे. दिल्लीचा कुशाग्र रावत हा भारतातल्या उत्कृष्ठ जलतरणपटू. 400 मीटर फ्री-स्टाईल प्रकारात तो विजेता ठरला होता. पण तो निकाल राखून ठेवला गेला. चोवीस तासानंतर निकाल जाहीर झाला तेव्हा आपण विजेते नसून लव्हली युनिव्हर्सिटीच्या साहिल चोप्रा या जलतरणपटूला विजेता ठरवले गेल्याचे त्याला समजले. याच साहिल चोप्राने 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात फ्लीक स्टार्ट (शिटी वाजवायच्या आधी केलेली सुरुवात) घेतला. तरीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मिहिर आंब्रे या भारतातल्या आघाडीच्या जलतरणपटूने त्याला मागे टाकत शर्यत जिंकली. पण इथेही साहिल चोप्रालाच विजेता ठरवण्यात आले.

इथून हे प्रकरण पेटायला सुरुवात झाली. कर्नाटकच्या लिखित एस. पी. या आघाडीच्या जलतरणपटूने निषेधाचा फलक स्पर्धा स्थानीच फडकावला. तिथून सुरु झाली संयोजकांकडून जलतरणपटूंना दमदाटी, शिवीगाळ.  संयोजक कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. इकडे जलतरणपटूंनी हातात शस्त्र घेतलं होतं. सोशल मिडियाचं. या माध्यमाचा प्रभाव त्यावेळी त्यांना कळला नसेल. पण दिशाहिन म्हणून समजल्या जाणाऱ्या या माध्यमातून सुटलेला अग्नीबाण पुढच्या काही तासांतच स्पर्धा संयोजकांच्या बुडाखाली जाळ काढून गेला. याची सुरुवात केली ती अंशूल कोठारी या जलतरणपटूनं. त्यानं देशाचे क्रीडामंत्री किरेन रिज्जू यांच्या नांवाने एक ट्विट केले. त्यात साहिल चोप्राने मारलेल्या फ्लीक स्टार्टचा व्हिडिओ देखिल होता. या ट्विटला अनेकांनी रिट्विट केले. अनेकांनी स्वतंत्रपण ट्विट करुन याबाबतचा निषेध नोंदवला. 

 भारतातले आघाडीचे जलतरणपटूही या निषेधात सहभागी झाले. दुसरीकडे जलतरणपटूंच्या हातातलं दुसरं हत्यारही चांगलंच काम करत होतं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शांतीदेवी मित्तल स्पोर्टस् काँप्लेक्समध्ये काय चालले आहे हे सगळीकडं पोहोचवलं जात होतं. त्यातच जलतरणपटूंनी बैठा सत्याग्रह सुरु केला. संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकला. हे देखिल अवघे क्रीडाविश्व सुन्न होऊन पाहत होतं.

वास्तविक उत्तरेकडच्या राज्यांत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये पक्षपातीपणाचे अनुभव अनेक खेळाडूंनी यापूर्वीही घेतले आहेत. पण इथं जरा जास्तच चाललं होतं. संयोजक काही केल्या नमायला तयार नव्हते. खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या विद्यापीठांनी पाठविलेले मार्गदर्शक-संघ व्यवस्थापक यांच्या माध्यमातून धमकावले जात होते. एका क्षणी तर चिडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी चक्क बाऊन्सर्स बोलावण्यापर्यंत संयोजकांची मजल गेली.  पण दुसऱ्या बाजूला अंशूल कोठारीने सोडलेला ट्विटर बाण क्रीडा मंत्रालयावर जाऊन धडकला होता. थेट क्रीडामंत्री किरेन रिज्जूंनीच त्याच्या ट्विटला उत्तर देत या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आणि ते प्रत्यक्षातही आणलं.

पुढच्या काही तासांतच असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या हाती या चौकशीची सूत्रं सोपवण्यात आली. या संपूर्ण स्पर्धेचा पूर्ण तपशील सादर करण्याचं आणि संबंधित गैरप्रकार करणारे स्पर्धा अधिकारी आणि खेळाडू यांना तात्काळ निलंबित करुन त्याबातचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्लीहून सुटले.  

ही बाजी पलटवली होती जलतरणपटूंच्या जिद्दीमुळं आणि सोशल मीडियातून त्याला मिळालेल्या साथीमुळं. तिकडं दिल्लीच्या पत्रामुळं स्पर्धा संयोजकांचे धाबे दणाणले. सर्व संबंधित स्पर्धा अधिकारी हाकलले गेले. ज्याच्यासाठी हे सगळे केले गेले त्या साहिल चोप्राला बडतर्फ करण्यात आलं आणि मुख्य म्हणजे ही सगळी कारवाई काळवंडलेल्या तोंडानं सगळ्या जलतरणपटूंसमोर उभे राहून सांगावी लागली. हा क्षण संतापलेले जलतरणपटू सोडतील तरच नवल. त्यांनी लव्हली युनिव्हर्सिटीच्या क्रीडा संचालकांकडून मागितली जाणारी माफी तातडीनं इन्स्टाग्रामवरुन सगळीकडं पोहोचवली. 

जलतरणटूंनी लढाई तर जिंकली. पण एकूण स्पर्धेतला खिलाडूपणाच हरवला होता. त्यामुळे अनेक जलतरणपटू खिन्न मनाने आपापल्या गावी परतले. पण यातून एक नक्की झालं. कुणीही नव्या पिढीला गृहित धरु नये. कागदी फाईलींचे घोडे नाचवण्याच्या युगात कदाचित असे आवाज दडपून जाऊ शकतात. पण आता नाही. कारण आता तरुणाईच्या हातात हत्यार आहे, 'सोशल मीडिया'. एक प्रकारचे ब्र्ह्मास्त्रच जणू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com