पती-पत्नीची जागतिक मैदानी स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्ती 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

डेकॅथलॉनमधील दोन वेळचा विश्‍वविजेता अमेरिकेचा ऍश्‍टन इटन आणि कॅनडाची असलेली त्याची पत्नी व हेप्टथलॉनमधील माजी इनडोअर विश्‍व विजेती ब्रायने थिसेन यांची दोहा स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दोहा -दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेला आता 50 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानिमित्याने डेकॅथलॉनमधील दोन वेळचा विश्‍वविजेता अमेरिकेचा ऍश्‍टन इटन आणि कॅनडाची असलेली त्याची पत्नी व हेप्टथलॉनमधील माजी इनडोअर विश्‍व विजेती ब्रायने थिसेन यांची दोहा स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

ऍश्‍टनने 2013 व 15 च्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2012 च्या लंडन व 16 च्या रिओ ऑलिंपीकमध्येही तो सुवर्णपदकाचा मानकरी होता. ब्रायनने 13 व 15 च्या स्पर्धेत रौप्य तर 2016 च्या रिओ ऑलिंपीकमध्ये ब्रॉंझ जिंकले होते. दोहा येथे प्रथमच डेकॅथलॉन आणि हेप्टथलॉन ही स्पर्धा 2 व 3 आक्‍टोबर रोजी सोबत-सोबत होणार आहे. हाच कार्यक्रम पुढील वर्षी टोकीयो ऑलिंपीकमध्येही राहणार आहे. या नियुक्तीबद्दल दोघांनी आनंद व्यक्त केला. ऍथलेटिक्‍सला माझ्या जीवनात एक वेगळे स्थान आहे आणि या सन्मानाबद्दल मी आयएएएफचे आभार मानते, असे ब्रायने म्हणाली. 2008 ला ब्राझीलमध्ये झालेल्या पॅन अमेरिकन ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या वेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमांत रुपांतर झाले. 2013 मध्ये दोघांनी विवाह केला आणि रिओ ऑलिंपीकनंतर दोघांनी निवृत्ती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ASHTON EATON AND BRIANNE THEISEN NAMED AMBASSADORS FOR IAAF WORLD ATHLETICS