
Asia Cup 2022 : पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज आशिया कप सुपर 4 मधील भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी चांगलाच ट्रोल झाला. मोहम्मद हाफीजने एका न्यूज चॅनलवर भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त लाड केले जातात कारण ते जास्त पैसे कमवून देतात असे वक्तव्य केले होते. (Mohammad Hafeez Trolled For Remark On Indian Cricket And BCCI Pampered By ICC)
मोहम्मद हाफीजने या वक्तव्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत मोहम्मद हाफीज म्हणतो की 'मला फार काही माहिती नाही, मात्र इतकं माहिती आहे की आपल्या समाजात जो कोणी कमावता असतो तो सर्वांचा लाडका असतो. त्याला सर्वांकडून जास्त किस मिळतात.'
हाफीज पुढे म्हणाला की, 'भारत हा उत्पन्न मिळवून देणारा देश आहे. जगभरातील द्विपक्षीय मालिकांमध्येही त्यांना प्रायोजक मिळतात. त्यांना जॅकपॉट लागतो. हे तथ्य मान्यच करावे लागेल.' न्यूज चॅनलच्या अँकरने भारत हा त्यांच्या खेळामुळे की पैसा कमवून देण्यामुळे सर्वांचा लाडका आहे असे विचारले त्यावेळी हाफीजने दुसऱ्या कारणाने भारत जास्त लाडका आहे असे उत्तर दिले.
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे भारतीय क्रिकेटबद्दलचे हे वक्तव्य भारतीय चाहत्यांना फारसे रूचले नाही. त्यांनी मोहम्मद हाफीजला ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका नेटकऱ्याने तर भारताच्या जगभरातील कामगिरीचा पाढाच वाचून दाखवला.