esakal | अपराजित भारत अखेर संयुक्त विजेताच
sakal

बोलून बातमी शोधा

अपराजित भारत अखेर संयुक्त विजेताच

अपराजित भारत अखेर संयुक्त विजेताच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही, तरीही भारतास या स्पर्धेत संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 176 वी लढत अखेर पावसामुळे रद्द झाली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील अपयशाची भरपाई विजेतेपदाने करण्याचे भारताचे स्वप्न दुरावले. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम लढतीसाठी संयोजकांनी तिकिटाचे दर दुप्पट केले होते, तरीही स्टेडियम हाउसफुल होते; पण पावसाने हॉकी रसिकांच्या उत्साहावर पाणी फिरवले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी 175 लढती झाल्या होत्या, त्यात 31 बरोबरीत सुटल्या आहेत; पण एकही लढत रद्द झाली नव्हती. रद्द झालेली ही पहिलीच लढत आहे, असे हॉकी सांख्यिकीतज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. 

भारत-पाकिस्तान अंतिम लढत सुरू होण्यास काही मिनिटे असताना जोरदार पाऊस सुरू झाला आणि तो एक तास थांबलाच नाही. अखेर मैदानाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिस्पर्ध्यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. मनप्रीत सिंगने नाणेफेक जिंकल्याने सुरवातीस करंडक भारताकडे राहील. त्यामुळे सुवर्णपदके पाक खेळाडूंना देण्यात आली. भारतीय खेळाडूंची सुवर्णपदके लवकरच देण्यात येतील. 

लक्षवेधक

  • जागतिक क्रमवारीत भारत पाचवा; तर पाक तेरावे 
  • पाकविरुद्धची सलामीची लढत सोडल्यास भारत कधीही पिछाडीवर नाही. 
  • भारताचे स्पर्धेत सर्वाधिक 30 गोल, त्याचबरोबर 11 जणांकडून गोल. 
  • भारत आणि पाकच्या यापूर्वीच्या एकंदर 31 लढती बरोबरीत, पण पावसामुळे रद्द झालेली ही पहिलीच लढत. 
  • या स्पर्धेत भारत-पाकमध्ये एकंदर नऊ लढती, त्यात भारताचे चार विजय आणि दोन पराभव आणि दोन ड्रॉ. 
  • भारत आणि पाक आता प्रत्येकी दोनदा विजेते आणि एकदा संयुक्त विजेते. 

आकाशदीप सर्वोत्तम; श्रीजेशचाही गौरव 
मस्कतला झालेल्या या स्पर्धेत आकाशदीप सिंगची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली, तर भारताचाच श्रीजेश स्पर्धेत सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. या स्पर्धेत भारताच्याच हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक सहा गोल केले, तर मनदीप सिंग आणि दिलप्रीतने प्रत्येकी पाच गोल केले.

loading image
go to top