Asian Boxing : सुमितची उपांत्य फेरीत धडक; पदक नक्की

भारतीय खेळाडूंचा आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पदक निश्‍चित करण्याचा सिलसिला सोमवारीही कायम राहिला
Asian Boxing
Asian Boxingsakal

अम्मान : भारतीय खेळाडूंचा आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतील पदक निश्‍चित करण्याचा सिलसिला सोमवारीही कायम राहिला. सुमितने पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात थायलंडच्या बोर्नवोर्न कडामड्यूएन याच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारताचे आणखी एक पदक पक्के केले.

सुमित हा थायलंड ओपन स्पर्धेचा विजेता आहे. त्याने या लढतीची सुरुवात जबरदस्त केली. आक्रमक बाणा व शानदार तंत्र याच जोरावर त्याने पहिल्या दोन फेऱ्या गाजवल्या, पण थायंलडच्या खेळाडूने अखेरच्या फेरीत झोकात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. अखेर सुमितने ३-२ असा विजय साकारत पुढे वाटचाल केली.

लवलीनासह सात महिला लढणार

भारताच्या सात महिला बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत. त्यामुळे भारताची ही सात पदके पक्की झाली आहेत. पदकाचा रंग कोणता असेल याचे उत्तर पुढे मिळेल. या सातही महिला खेळाडूंच्या उपांत्य लढती बुधवारी होणार आहेत. लवलीना बार्गोहेन (७५ किलो वजनी गट), जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक जिंकलेली परवीन (६३ किलो वजनी गट) या दोन महिला खेळाडूंसह मीनाक्षी (५२ किलो वजनी गट), प्रीती (५७ किलो वजनी गट), अंकुशिता बोरो (६६ किलो वजनी गट), स्वीटी (८१ किलो वजनी गट) व अल्फिया (+८१ किलो वजनी गट) या खेळाडूंनाही भारतासाठी पदक जिंकता येणार आहे.

पुुरुष गटामध्ये शिव थापा, मोहम्मद हुसामुद्दीन, गोविंद कुमार व सुमित यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करीत भारताचे या स्पर्धेतील पदक पक्के केले आहे. सोमवारी रात्रीपर्यंतच्या पुरुष व महिला अशा दोन्ही गटांच्या निकालावर नजर टाकल्यास भारताची ११ पदके निश्‍चित झाली आहेत.

सचिन, लक्ष्यकडून निराशा

भारताच्या दोन पुरुष बॉक्सर्सकडून सोमवारी निराशा झाली. सचिन (७१ किलो वजनी गट) व लक्ष्य चहर (८० किलो वजनी गट) या दोन खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. कझाकस्तानच्या अस्लानबेक एस. याच्याकडून सचिनचा ४-१ असा पराभव झाला. तसेच उझ्बेकिस्तानच्या अस्लोनोव ओडीलजोन याने लक्ष्यवर ५-० असा सहज विजय साकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com