कामगिरी उंचावली; पण सुधारणेस वाव

पूजा घाटकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा नेमबाजी स्पर्धेची सांगता भारतासाठी पदकाविना झाली. पहिल्या सहा दिवसांत नऊ पदके जिंकल्यावर अखेरच्या दोन दिवसांत एकही पदक जिंकता आले नाही. अखेरच्या दिवसाच्या स्कीट प्रकारातील अपयशापेक्षा २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात अनिष अंतिम फेरीपासूनही दूर राहिला हे सलणारे होते. मात्र एकंदरीत विचार केला तर चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेपेक्षा आपली कामगिरी नक्कीच चांगली झाली.

चार वर्षांपूर्वीप्रमाणेच आपण नऊ पदके जिंकली असली, तरी गतस्पर्धेत चार पदके सांघिक प्रकारातील होती. त्याचा ऑलिंपिकमध्ये समावेश नसतो. या वेळी जिंकलेली सर्व पदके ऑलिंपिकमध्ये असलेल्या प्रकारातील आहेत. त्याचबरोबर गतस्पर्धेप्रमाणे सेंटर फायर पिस्तूल, ५० मीटर प्रोन आणि ५० मीटर फ्री पिस्तूल हे प्रकार या स्पर्धेत नव्हते. या प्रकारात भारतीयांची कामगिरी चांगली होत असे. हे प्रकार नसतानाही आपण नऊ पदके जिंकली; त्यामुळे गतस्पर्धेपेक्षा आपली कामगिरी नक्कीच सुधारली, असे म्हणता येईल. 

आपल्या यशात खूपच लहान असलेल्या; तसेच अनुभवी नेमबाजांचा सारखाच वाटा आहे. हीना, राहीने पदक जिंकताना अनुभवाचे महत्त्व दाखवले. या दोन्ही प्रकारांत मनू भाकरने प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी केली होती. एकात तर मनू जागतिक विक्रमाच्या नजीक गेली होती; पण अंतिम फेरीत तिची कामगिरी खालावली. पंधरा वर्षीय सौरभ चौधरी याने सुवर्णपदक जिंकताना जपानच्या नावाजलेल्या नेमबाजांना मागे टाकले. 

या यशानंतरही कामगिरी पूर्ण अपेक्षेइतकी झाली, असे म्हणता येणार नाही. १० मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंडेला, एलावेनील यांच्याकडून पदकाची अपेक्षा होती. अपूर्वीला अंतिम फेरीत गेल्याचेच समाधान लाभले. महिलांच्या थ्री पोझीशनमध्ये अंजुम मौदगिल, एन. गायत्रीला अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले. यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमधील दुरावलेले यश हे पाहता कामगिरीला नक्कीच वाव होता, असे म्हणता येईल. आता नेमबाजांचे सर्व लक्ष जागतिक स्पर्धेकडे असेल. ऑलिंपिकसाठीची ही पहिली पात्रता स्पर्धा आहे. त्यात जास्त चुरस असेल. आपले अधिकाधिक नेमबाज त्यात यश मिळवतील, अशी नक्कीच अपेक्षा आहे.

Web Title: Asian Games Pooja Ghatkar article