Boxing Day Test : 'बॉक्सिंग डे कसोटी' म्हणजे काय? कधी सुरू झाले? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

क्रिकेट जगतात 26 डिसेंबरच्या कसोटीला 'बॉक्सिंग डे कसोटी' का म्हणतात?
Boxing Day Test AUS vs SA
Boxing Day Test AUS vs SA sakal

Boxing Day Test AUS vs SA : दरवर्षी 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात, मग ती जगात कुठेही खेळली जात असली तरीही. पण प्रश्न असा आहे की बॉक्सिंग डे म्हणजे काय? 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे का म्हणतात? सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामनाही बॉक्सिंग डे आहे,पण त्याचा इतिहास काय आहे?

बॉक्सिंग डेची सुरुवात कधी झाली? (Boxing Day Test)

18 व्या शतकात राणी व्हिक्टोरिया इंग्लंडमध्ये राज्य करत होती. तिच्या कारकिर्दित २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे हे नाव मिळाले. याचा बॉक्सिंग खेळाशी काही संबंध नाही. श्रीमंत लोकं गरीब लोकांसाठीचे बॉक्समध्ये गिफ्ट पॅक करुन देत असत. या प्रथेमधूनच बॉक्सिंग डेचा उदय झाला.

बॉक्सिंग डे ((Boxing Day) हा पारंपरिकरित्या कामगार, नोकरांचा सुट्टीचा दिवस म्हणून ओळखला जात होता. त्या दिवशी त्यांना आपल्या मालकांकडून ख्रिसमसचे (Christmas) बॉक्स मिळत होते. या दिवशी नोकर आपल्या घरी जात असत ते आपल्या कुटुंबासाठी बॉक्समधून ख्रिसमस गिफ्ट (Christmas Box) घेऊन जात असत.

या दिवसाला धार्मिक संदर्भही आहे. हा दिवस आयर्लंड आणि स्पेनच्या कॅटलोनिया भागात सेंट स्टिफन दिवस (Saint Stephen's Day) म्हणूनही साजरा केला जातो. युरोपातील हंगेरी, जर्मनी, पोलंड आणि नेदरलँड या देशांमध्ये बॉक्सिंग डे हा ख्रिसमसचा दुसरा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

दानपेटी उघडण्याचा दिवस

बॉक्सिंग डे चर्च देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. वर्षभरात चर्चमध्ये येणारे भाविक दानपेटीत दान टाकत असतात. त्यानंतर वर्षभरात भाविकांकडून मिळालेल्या देणग्यांची पेटी ख्रिसमसच्या दिवशी (Christmas Day) उघडली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बॉक्सिंग डेला ही देणगी गरीबांमध्ये वाटली जाते.

आजच्या घडीला हे ख्रिसमस बॉक्स(Christmas Box) फारसे प्रसिद्ध नाहीत. काही लोक पेपर बॉय आणि गर्ल्ससाठी ख्रिसमसच्या आठवडाभर आधी काही पैसे सोडतात त्यांनाच ते ख्रिसमस बॉक्स म्हणतात.

क्रिकेटमध्ये बॉक्सिंग डे चा काय आहे इतिहास?

1865 पासून ऑस्ट्रेलियात शेफिल्ड शिल्डमधील व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर(Melbourne Cricket Ground) ख्रिसमसच्या काळात सामना खेळवण्याची परंपरा होती. त्यातील बॉक्सिंग डे हा एक दिवस असायचा. त्यामुळे अनेक न्यू साऊथ वेल्स संघातील खेळाडू आपल्या कुटुंबाबरोबर ख्रिसमस साजरा करण्यापासून मुकायचे. त्यामुळे मेलबर्न कसोटी नवीन वर्षात खेळवली जाऊ लागली. ही कसोटी सहसा 1 जानेवारीपासून सुरु होत असे.

1950 - 51 च्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) मेलबर्न कसोटी ही २२ ते २७ डिसेंबर दरम्यान खेळवली गेली होती. यावेळी कसोटीचा चौथा दिवस बॉक्सिंग डे दिवशी आला होता. पण, १९५३ ते १९६७ दरम्यान मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डेला कोणताही कसोटी सामना खेळला गेला नव्हता. त्यानंतर 1974 - 75 च्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत सहा कसोटी सामने खेळवण्यात आले. त्यावेळी मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डेला तिसरा सामना झाला होता. त्यानंतर मेलबर्नवर बॉक्सिंग डेला कसोटी सामना खेळवण्याचा नवी परंपरा सुरु झाली. त्यानंतर 1980 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट यांनी प्रत्येक वर्षी बॉक्सिंग डेला एमसीजीवर(MCG) कसोटी सामना खेळवण्याचे हक्क आपल्याकडे घेतले.

फुटबॉल मधील बॉक्सिंग डे परंपरा

ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये फुटबॉलचे (Football) सामने होणे हा आता प्रघात झाला आहे पण, पूर्वी असे नसायचे. ज्यावेळी टीव्ही युग सुरु झाले नव्हते. त्यावेळी ब्रिटनमध्ये २५ डिसेंबरला फुटबॉल चाहते मैदानावर उपस्थिती दर्शवत सामन्याचा आनंद घ्यायचे. पण, १९५० नंतर ख्रिसमस डेला खेळ खेळण्याबाबतचा कल बदलला. त्यामुळे शेवटचा ख्रिसमस डेचा फुटबॉल सामना १९५७ ला खेळवण्यात आला. त्यानंतर आता बॉक्सिंग डेला (Boxing Day) फुटबॉलचा सामना खेळण्याची परंपरा सुरु झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com