Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाने 'ऍशेस' कायम राखल्या!

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

इंग्लंडच्या फलंदाजांनी सामना अनिर्णित राखण्याच्या उद्देशाने टिच्चून फलंदाजी केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी संयम सोडला नाही.

ऍशेस 2019 : मँचेस्टर : इंग्लंडचा कडवा प्रतिकार मोडून काढत ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी 185 धावांनी विजय मिळविला. या विजयासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत 'ऍशेस' आपल्याकडेच कायम राखण्यात यश मिळविले. 

विजयासाठी 383 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवस अखेरीसच दोन गडी गमावले होते. त्यानंतर आज अखेरच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आणखी एका जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करताना विजय निसटणार नाही याची काळजी घेतली.

इंग्लंडच्या फलंदाजांनी सामना अनिर्णित राखण्याच्या उद्देशाने टिच्चून फलंदाजी केली. पण, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी संयम सोडला नाही. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना कोंडित पकडण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांनी इंग्लंडचा दुसरा डाव 197 धावांत गुंडाळत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पॅट कमिन्सने चार, तर हेझलवूड आणि लायन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

इंग्लंडला ज्यो डेन्ली आणि जेसन रॉय यांनी आज चांगली सुरवात करून दिली. संयमाने फलंदाजी करताना त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. दुसऱ्या डावाच्या सुरवातीच्या षटकांतच दोन गडी बाद झाल्यावर त्यांनी दाखवलेला संयम महत्वाचा होता. मात्र, कमिन्सने पुन्हा एकदा त्यांना दणके दिले. त्याने प्रथम रॉयचा बचाव भेदला आणि नंतर स्टोक्‍सला यष्टिरक्षक पेनकडे झेल देण्यास भाग पाडले. लगोलग लायनने डेन्लीच्या संयमाची कसोटी पाहिली. मग बेअरस्टॉ आणि बटलर यांनी तग धरला. पण, ही जोडीही मोठी भागीदारी रचू शकली नाही. स्टार्कने बेअरस्टॉची विकेट मिळविल्याने चहापानाला इंग्लंड 6 बाद 166 असे अडचणीत आले. 

चहापानानंतर लगेचच हेझलवडूने बटलरचा त्रिफळा उडवला. लायनने आर्चरला बाद केले. इंग्लंड 8 बाद 173 असे अडचणी आले. पराभव समोर दिसत असतानाही जॅक लीच आणि ख्रेग ओव्हर्टन यांनी तब्बल 14 षटके खेळून काढली. षटके संपत चालली तसा ऑस्ट्रेलियाची धकधक वाढली. पेनने बदली गोलंदाज लाबुशेनकडे चेंडू सोपवला. त्याचा हा धाडसी निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. त्याने लीचची विकेट मिळवली आणि नंतर लगेच हेझलवूडने ओव्हर्टनची झुंज मोडून काढत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

- लिओनेल मेस्सी बार्सिलोनाला गुडबाय करणार?

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया 8 बाद 497 घोषित आणि 6 बाद 186 (घोषित) वि.वि. इंग्लंड 301 आणि 197 (ज्यो डेन्ली 53 123 चेंडू, 6 चौकार, जेसन रॉय 31, जोस बटलर 34, जॉनी बेअरस्टॉ 25, क्रेग ओव्हर्टन 21 जॅख लीच 12, पॅट कमिन्स 24-9-43-4, हेझलवूड 17.3-5-31-2, नॅथन लायन 29-12-51-2, स्टार्क 1-46, लाबुशेन 1-9)

- कार्तिकला बसला 'बीसीसीआय'च्या नोटीसचा दणका!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia retain Ashes after victory at Old Trafford