World Cup 2019 : टायगर्सने कांगारूंना झुंजविले; ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी विजय

World Cup 2019 : टायगर्सने कांगारूंना झुंजविले; ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी विजय

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : बांगलादेशने आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील झुंजार कामगिरी कायम राखली. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 382 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान दिल्यानंतरही त्यांनी झुंजार प्रयत्न केले. बांगला टायगर्सला 48 धावांनी पराभूत व्हावे लागले. पण, त्यांनी कांगारूंना प्रतिकार करीत आपल्या चाहत्यांची मने नक्कीच जिंकली. यष्टिरक्षक-फलंदाज मुशफीकुर याने नाबाद शतक काढले. 

पराभूत व्हावे लागले, तरी बांगलादेशने आपला नेट रनरेट शक्‍य तेवढा उंचाविण्याचा प्रयत्न केला; जे त्यांच्यासाठी स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात उपयुक्त ठरू शकते. त्यांनी 8 बाद 333 अशी मजल मारली. 

बांगलादेशची सुरवात प्रतिस्पर्धी कर्णधार फिंचने विस्कळित केली. त्याच्या थेट थ्रोवर सरकार धावचीत झाला. स्पर्धेत विलक्षण फॉर्म गवसलेल्या शकीब व सलामीवीर तमिम यांनी 79 धावांची भर घातली. त्यांची अर्धशतकी भागीदारी 54 चेंडूंत पूर्ण झाली. त्यांनी 18व्या षटकात शतक फलकावर लावले. स्टॉयनीसने शकीबची मोलाची विकेट मिळविली. त्यानंतर डावाच्या मधल्या टप्प्यात कांगारूंनी आवश्‍यक धावगतीच्या आसपास जाण्याचे प्रतिस्पर्ध्यांचे प्रयत्न मोडून काढले, जे निर्णायक ठरले. 

अशावेळी दडपण असूनही मुशफीकुर-महमदुल्ला यांनी 127 धावांची भागीदारी रचत प्रतिकार कायम ठेवला. अर्धशतकी भर 50 चेंडूंत घातल्यावर त्यांनी पुढील 50 धावा 30 चेंडूंत फटकाविल्या. यात महमदुल्ला याने झॅम्पावर आक्रमण केले होते. 

कुल्टर-नाईलने हप्त्यातील अखेरच्या षटकात महमदुल्ला आणि शब्बीर रेहमान यांना लागोपाठ बाद केले. त्याने महमदुल्ला याला आखूड टप्प्याच्या चेंडूवर चकविले, तर रेहमान यष्टीबाहेरील चेंडू स्टम्पवर ओढवून घेत बाद झाला. मेहदी हसन मिराझने हॅट्ट्रिक हुकविली. मुशफीकुर याने 95 चेंडूंत शतक पूर्ण केले. 

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नरच्या तडाखेबंद दीड शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 381 अशी भलीमोठी धावसंख्या उभी केली. 
काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडीजची 321 ही धावसंख्या 42 व्या षटकांतच पार करून बांगलादेशने इतर प्रतिस्पर्ध्यांनाही धोक्‍याचा इशारा दिला; परंतु गतविजेत्या आणि ताकदवान ऑस्ट्रेलियाने विंडीजपेक्षाही मोठी मजल मारून बांगलादेशला "रिऍलिटी चेक' दाखवला. वॉर्नरची 147 चेंडूंतील 166 धावांची खेळी, कर्णधार ऍरॉन फिंचचे अर्धशतक आणि उस्वाम ख्वाजाचा 89 धावांचा तडाखा बांगालदेश गोलंदाजांच्या उणिवा स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. 

त्रिशतकी धावांचा पाठलाग करण्याची हिंमत बांगलादेशने दाखवलेली असली, तरी आज ऑस्ट्रेलियाने तेच आव्हान मानून प्रथम फलंदाजी स्वीकारली. वॉर्नर आणि फिंच हे दोघेही सलामीवर चांगलेच फॉर्मात असल्यामुळे फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर बांगलादेशी गोलंदाजांची क्षमता पणास लागणार हे उघड होते. स्पर्धेत आत्तापर्यंत दोन शतके करणाऱ्या फिंचने पहिल्यापासून आक्रमक पवित्रा घेतला; तर यंदा सावध पवित्रा घेऊन नंतर आक्रमक होणाऱ्या वॉर्नरचीही आजची सुरवात वेगवान होती. त्यामुळे 21 व्या षटकांत त्यांनी 121 धावांची सलामी दिली; तेथेच ऑस्ट्रेलिया मोठी मजल मारणार हे निश्‍चित झाले. फिंचला 53 धावांवर बाद करण्यात बांगलादेशला यश आले; परंतु त्यानंतर वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी अधिक प्रहार केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. त्यमुळे 45 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 313 धावा झळकल्या होत्या. 
वॉर्नर द्विशतकाकडे कूच करत होता. बांगलादेशचे सर्व प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत होते. अशा वेळी सौम्या सरकार या बदली गोलंदाजाने हात दिला आणि त्याने प्रथम वॉर्नरची घोडदौड रोखली. त्यानंतर ख्वाजालाही बाद केले. या दरम्यान ग्लेन मॅक्‍सवेलने 10 चेंडूंत 32 धावांचा झंझावात सादर केला. बांगलादेशचे सुदैव की तो धावचीत झाला. 

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 5 बाद 381 (डेव्हिड वॉर्नर 166 -147 चेंडू, 14 चौकार, 5 षटकार, ऍरॉन फिंच 53 -51 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, उस्मान ख्वाजा 89 -72 चेंडू, 10 चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल 32 -10 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, मुस्तफिजूर रहीम 9-0-69-1, सौम्या सरकार 8-0-58-3) विजयी विरुद्ध बांगलादेश ः 50 षटकांत सर्वबाद 333 (तमिम इक्‍बाल 62-74 चेंडू, 6 चौकार; सौम्या सरकार 10, शकीब अल हसन 41-41 चेंडू, 4 चौकार; मुशफीकुर रहीम नाबाद 102-97 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार; लिटॉन दास 20, महमदुल्ला 69-50 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार; मिचेल स्टार्क 10-0-55-2, पॅट कमिन्स 10-1-65-0, नॅथन कुल्टर-नाईल 10-0-58-2, मार्कस स्टॉयनीस 8-0-54-2, ऍडम झॅम्पा 9-0-68-1)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com