
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात न जाण्याच्या सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलिया देण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशातील क्रिकेट स्पर्धा थांबविल्या आहेत.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात न जाण्याच्या सूचना क्रिकेट ऑस्ट्रेलिया देण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशातील क्रिकेट स्पर्धा थांबविल्या आहेत. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया सरकार आपल्या खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी देणार नाही, अशीच चिन्हे आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप कोणत्याही थेट सूचना खेळाडूंना दिलेल्या नाहीत. पण, खेळाडू योग्य निर्णय घेतील, अशी टिप्पणी केली आहे. खेळाडूंचा आयपीएलबरोबर वैयक्तिक करार आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी सांगितले. आम्ही केवळ सल्ला देऊ शकतो. खेळाडू लवकरच आमचा सल्ला जाणून घेतील. आम्ही त्यांना त्या वेळी योग्य सल्ला देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.