बॅडमिंटनपटू आदित्यने जिंकल्या एकाच महिन्यात तीन राज्य स्पर्धा

मूर्ती छोटी, पण कामगिरी मोठी : कर्तृत्वावर श्रद्धा ठेवून गाठले यश
Badminton player Aditya won three state championships
Badminton player Aditya won three state championships

नागपूर : एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असेल आणि त्या दिशेने तुम्ही कसून मेहनत घेतली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्यातच आपण गुरू मानलेल्या प्रशिक्षकावर त्यांच्या विचारावर आणि कर्तृत्वावर श्रद्धा ठेवली तर यशाला गवसणी घालता येते हे लहानगा बॅडमिंटनपटू आदित्य याऊलने आपल्या कामगिरीने ते सिद्ध केले. अवघ्या दहा वर्षांच्या आदित्यने गेल्या महिन्यात एकापाठोपाठ तीन राज्य बॅडमिंटन स्पर्धा जिंकून आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे दाखवून दिले. आदित्यचे आतापर्यंतचे भन्नाट प्रदर्शन लक्षात घेता ‘मूर्ती छोटी, पण कामगिरी मोठी’ ही म्हण त्याच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरते.

कोराडी रोडवरील स्मृतीनगरमध्ये राहणाऱ्या आदित्यला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. विरंगुळा म्हणून घराच्या कंपाउंडमध्ये वडिलांसोबत बॅडमिंटन खेळत असताना वडिलांनी बॅडमिंटनसाठी आवश्यक असलेले त्याच्यातील ‘हॅण्ड आय कोऑर्डीनेशन’ अचूक हेरले. आदित्यमधील गुणवत्ता आणि कल बघून त्यांनी अधिक वेळ न घालविता सहाव्याच वर्षी आदित्यला बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरविले. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात प्रशिक्षक अमित राऊत यांनी सकाळ-संध्याकाळ मेहनत घेत या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम केले. कठोर परिश्रमाच्या जोरावर अल्पावधीतच आदित्यने आपली गुणवत्ता सिद्ध केली.

आदित्यने गेल्या चार वर्षांत जिल्हा व खासदार चषकासह अनेक स्थानिक स्पर्धा गाजविल्या. मात्र, खरा धमाका त्याने मागच्या ऑगस्ट महिन्यात केला. महिनाभरात त्याने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन राज्य बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सलग तीन विजेतेपद जिंकून स्वतःची छाप सोडली. २ ऑगस्टला सांगलीमध्ये ११ वर्षे वयोगटात एकेरी व १३ वर्षे वयोगटात दुहेरीचे विजेतेपद मिळविल्यानंतर १५ दिवसांनी पालघरमध्येही ११ वर्षे वयोगटात अजिंक्यपद पटकाविले. लगेच अंधेरी (मुंबई) येथे झालेल्या राज्य ज्युनिअर स्पर्धेतही ११ वर्षे वयोगटात त्याने विजेतेपदावर स्वतःचे नाव कोरले. भवन्स कोराडी शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेल्या आदित्यला भविष्यात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. बॅडमिंटनच्या कोर्टवर आदित्यची सुरू असलेली धमाल कामगिरी बघता नागपूरचा हा तारा निश्चितच नजिकच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल, यात तिळमात्र शंका नाही.

यशासाठी गुरू आणि श्रद्धा आवश्‍यक !

कोणीही जन्माने श्रेष्ठ नसून कर्म आणि कर्तृत्त्वाने श्रेष्ठ ठरतो. ही आपल्याला गीतेतून शिकवण मिळते. या गीतातत्त्वावर विश्‍वास ठेवला तर कोणतेही मोठे कार्य आपण तडीस नेऊ शकतो. पण त्यासाठी योग्य मार्गाची, दिशेची, ती दाखविणाऱ्या गुरूची गरज असते. आई ही आपली आद्यगुरू असते तर शिक्षक, प्रशिक्षक आपल्याला ध्येयसिद्धीपर्यंत नेणारे मार्गदर्शक असतात. अर्जुनाने ज्याप्रकारे भगवान श्रीकृष्णावर विश्‍वास ठेवला. तोच विश्‍वास बाळगण्याची आपल्याला शिकवण गीता, संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी अथवा संत तुकाराम यांच्या आध्यात्मिक विचारातून मिळते. विजयासाठी कर्म ही संघर्षाची प्रथम पायरी आहे. त्यासाठी गुरूंच्या विचारांवर श्रद्धा ठेवल्यास यश हमखास मिळते. ही श्रद्धा बाळगणे खेळाडू असो की विद्यार्थी अथवा कुणीही सर्वांनाच ते इष्ट ठरते.

मुलासाठी आईचा त्याग

खेळाडूला घडविण्यात जेवढी मेहनत त्याच्या गुरूची असते, तेवढाच त्याग आणि तपस्या आई-वडिलांनाही करावी लागते. आदित्यचे वडील (मयूर याऊल) स्वतःचे खासगी आयटीआय चालवितात. इथेच आदित्यची आई (ज्योत्स्ना याऊल) देखील शिकवायची. मात्र, मुलाला पुरेसा वेळ देता यावा म्हणून त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. आदित्यने राज्य स्पर्धेपर्यंत मजल मारत आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज केले. आदित्यच्या यशात त्याच्या मेहनतीसह गुरू व जिल्हा संघटनेचेही फार मोठे योगदान असल्याचे वडिलांनी सांगितले.

आदित्यने अगदी पहिल्या दिवसापासून मला प्रभावित केले. त्याचे ‘बेसिक्स’ एकदम पक्के असून, ‘रीच’ कमालीची आहे. शिवाय तो अजिबात घाबरत नाही. परिस्थिती पाहून लगेच स्वतःला ॲडजस्ट करतो. उल्लेखनीय म्हणजे त्याचे फिटनेस जबरदस्त व उच्चदर्जाचे आहे. एका चॅम्पियन बॅडमिंटनला आवश्यक असलेले सर्व गुण त्याच्यात ठासून भरले आहे. या सर्व गुणांमुळे तो एकदिवस नक्कीच देशविदेशात तिरंगा फडकावेल, असा मला विश्वास आहे.

-अमित राऊत, आदित्यचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com