CWG 2022 : बजरंग पुनियाचा गोल्डन शड्डू; 65 किलो वजनी गटात जिंकले सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajrang Punia Won gold Medal in 65 kg Men Wrestling In Commonwealth Games 2022

CWG 2022 : बजरंग पुनियाचा गोल्डन शड्डू; 65 किलो वजनी गटात जिंकले सुवर्ण

Commonwealth Games 2022 : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने कॅनडाच्या 21 वर्षाच्या लॅचलीन मक्नेलचा पराभव केला. बजरंगने मक्नेलचा 9 - 2 असा पराभव केला. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्ड मेडल आहे. त्याने 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत देखील 65 किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली होती. तर 2014 ला ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. बजरंगच्या सुवर्ण पदकामुळे भारताचे पदक तालिकेत आता 7 सुवर्ण झाले आहेत.

65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पहिल्याच सत्रात 4 गुण मिळवत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर मॅक्नेलने दुसऱ्या डावात आक्रमक खेळी करत दोन गुण मिळवले.

त्यानंतर बजरंग पुनियाने मॅक्लेनला रिंगच्या बाहेर ढकलत दोन गुण मिळवत पुन्हा आघाडी 4 गुण मिळवले. बजरंग पुनियाने मॅक्लेनच्या पायावर सातत्याने आक्रमण केले. त्याने पुन्हा रिंगच्या बाहेर ढकलत एक गुण मिळवला. सामना संपता संपता बजरंगने दोन गुण मिळवत सामना 9 - 2 असा एकतर्फी जिंकला.

महिला फ्रीस्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू अंशू मलिकचा नायजेरियाच्या ओडूनायोने पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. अंशू मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अंशू मलिकचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पण आहे. अंशूने आपले सलग दोन सामने तांत्रिक सरसतेच्या जोरावर जिंकत फायनल गाठली होती.