वनडे मालिकेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल; कारण आहे 'राजकीय' | Bangladesh vs India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh vs India Schedule

Bangladesh vs India : वनडे मालिकेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल; कारण आहे 'राजकीय'

Bangladesh vs India Schedule : भारत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिका ही 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका आधी बांगलादेशची राजधानी ढाका येथे होणार होती. मात्र आता वनडे मालिकेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वनडेमालिकेदरम्यान राजधानी ढाकामध्ये विरोधीपक्षातर्फे आंदोलन केले जाणार आहे. यादरम्यान ढाकामध्ये ताणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनडे मालिका ढाकातून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?

भारत 2015 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशचा दौरा करणार आहे. यासाठी भारतीय संघ पुढच्या आठवड्यात बांगलादेशला रवाना होणार आहे. दौऱ्याची सुरूवात 4 डिसेंबरला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेने होईल. सुरूवातीच्या वेळापत्रकानुसार तीनही वनडे सामने हे ढाका येथे खेळवण्यात येणार होते. मात्र आता मालिकेतील तिसरा वनडे सामना हा चितगांव येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या आंदोलनाचा फटका या सामन्याला बसणार नाहीये. या आंदोलनादरम्यान हजारो नागरिक ढाकाच्या रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

बांगलादेश नॅशनिलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांच्या नेतृत्वातील सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठी देशभरात गेल्या महिन्याभरापासून अनेक मोठी आंदोलने आयोजित करण्यात आली आहेत. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचानल प्रमुख जलाल युनूस यांनी बुधवारी सांगितले की, 'चितगांव स्टेडियम हे भारत दौऱ्यावरील एक कसोटी आयोजित करणार होते. आम्हाला वाटते की या मैदानावर एक वनडे सामना देखील व्हावा.'

हेही वाचा: Dinesh Karthik : 'जपण्यासारख्या अनेक आठवणी...', ​​डीकेने घेतली निवृत्ती ?

जलाल यांनी ढाकामध्ये आंदोलन होणार आहे त्यामुळे तिसरी वनडे हलवण्यात आली का याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र स्थानिक माध्यमांनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एक सूत्रानेच आंदोलनाचा फटका सामन्याला बसू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. चितगांवमध्ये भारत - बांगलादेश यांच्यात 14 ते 18 डिंसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना होईल तर 22 ते 26 डिसेंबरदम्यान ठाकामध्ये दुसरी कसोटी होईल.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...