esakal | नेमार, मेस्सी, सुआरेझच्या धडाक्‍याने बार्सिलोनाचा विजय
sakal

बोलून बातमी शोधा

नेमार, मेस्सी, सुआरेझच्या धडाक्‍याने बार्सिलोनाचा विजय

नेमार, मेस्सी, सुआरेझच्या धडाक्‍याने बार्सिलोनाचा विजय

sakal_logo
By
वृत्तसंस्था


बार्सिलोना : लियोनेल मेस्सी, नेमार आणि लुईस सुआरेझ यांच्या तुफानी खेळामुळे बार्सिलोना एफसी संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात अल्वेस संघाचा 6-0 असा धुव्वा उडवला. अन्य एका सामन्यात रेयाल माद्रिद संघानेही विजय मिळवून गुणतक्‍त्यातील आघाडीच्या शर्यतीत बार्सिलोनावर एका गुणाची आघाडी मिळविली.
बार्सिलोनाचा विजयाचा आनंद मात्र ऍलेक्‍सी व्हिडालच्या गंभीर दुखापतीमुळे कमी झाला. सामना संपण्यास पाच मिनिटे असताना व्हिडालला डाव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. व्हिडाल चेंडू घेऊन मुसंडी मारत असताना थेओ हर्नाडेझने त्याला अडवडण्याचा प्रयत्न केले. तेव्हा त्याच्या पायाची जोरदार किक व्हिडालच्या घोट्यावर बसली. कळवळून खालीच पडलेल्या व्हिडालला नंतर मैदान सोडावे लागले.


त्यापूर्वी, सामन्याच्या 37व्या मिनिटाला व्हिडालच्या पासवर सुआरेझने बार्सिलोनाचे खाते उघडले. त्यानंतर तीनच मिनिटांनी नेमारने अल्वेसच्या गोलरक्षक फर्नांडो पाचेकोकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवला. पुढे 59व्या मिनिटाला मेस्सीने गोलरक्षक पाचेकोला निष्प्रभ ठरवले. उत्तरार्धात या वेगवान झालेल्या खेळात ऍलेक्‍सी रुआनो याने स्वतःच्याच संघावर एक गोल केला. इव्हान रॅकटिक याने पाचवा आणि शेवटी सुआरेझने वैयक्तिक दुसरा गोल करून संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयाने बार्सिलोना संघ यंदाच्या मोसमात प्रथमच आघाडीवर आला. बार्सिलोनाची ही आघाडी रेयाल माद्रिदच्या विजयाने क्षणिक ठरली. लीगमधील अन्य एका संघर्षपूर्ण लढतीत रेयाल माद्रिदने ओसासुना संघावर 3-1 असा विजय मिळविला. बार्सिलोनाचे आता 48 गुण झाले असून, रेयाल माद्रिद 47 गुणांसह आघाडीवर आहे.

loading image
go to top