esakal | गतविजेते बायर्न म्युनिच चॅम्पियन्स स्पर्धेतून बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

football

गतविजेते बायर्न म्युनिच चॅम्पियन्स स्पर्धेतून बाहेर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पॅरीस- गतविजेत्या बायर्न म्युनिचचे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. बायर्नने पीएसजीला परतीच्या लढतीत १-० असे हरवले खरे; पण अवे गोलात कमी पडल्याचा फटका बायर्नला बसला. बायर्न पीएसजीविरुद्ध घरच्या मैदानावर २-३ पराजित झाले होते. दोन्ही लढतीनंतर एकत्रित निकालात ३-३ बरोबरी झाली. या परिस्थितीत सरस अवे गोल लक्षात घेतले जातात. या वेळी पीएसजीचे अवे गोल तीन होते; तर बायर्नचा अवघा एक. गतस्पर्धेतील अंतिम सामन्यात बायर्नने पीएसजीचा पाडाव केला होता. त्याचीच आठवण परतीच्या लढतीने करून दिली. नेमारची किक दोनदा गोलपोस्टवर लागून परतली; पण पीएसजीचे वर्चस्व होते. बायर्नने जम बसल्यावर जोरदार प्रतिकार सरू केला. एरीक मॅक्जीम याच्या गोलमुळे बायर्नने आघाडी घेतली. अनफिट रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या अनुपस्थितीत बायर्नच्या आक्रमणात जान नव्हती. बायर्न जिद्दीने प्रतिकार करीत होते. त्यांनी चांगला बचाव करीत पीएसजीला आक्रमणापासून चांगले रोखले होते; पण त्यांचे दुसऱ्या गोलचे प्रयत्न विफल ठरले. अर्थात नेमार आणि एम्बापेच्या धडाक्यास बायर्नने चांगलीच वेसण घातली होती.

चेल्सी सात वर्षांनी उपांत्य फेरीत

चेल्सीने सात वर्षांनंतर चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांना पोर्तोविरुद्धच्या परतीच्या लढतीत ०-१ हार पत्करावी लागली; पण एकत्रित निकालात त्यांनी २-१ विजय मिळवला. चेल्सीने २०१४ नंतर प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या टप्प्यातील विजयामुळे चेल्सीने बचावाकडे जास्त लक्ष दिले होते. पोर्तोच्या आक्रमणात भेदकता नव्हती. थॉमस टशल यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून चेल्सीने १८ पैकी एकच लढत गमावली आहे.