उत्तेजकातील दोषींवर बीसीसीआयचा बंदीचा फार्स

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंवर बंदीची औपचारिकताच पार पाडत असल्याचे पृथ्वी शॉवरील बंदीच्या प्रकरणातून पुन्हा दिसल्याचेच मानले जात आहे. दोन मोसमापूर्वी युसुफ पठाण बंदीच्या कालावधीत दोन रणजी लढती खेळला होता, तर आता पृथ्वी शॉ बंदीच्या कालावधीत आयपीएल खेळला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंवर बंदीची औपचारिकताच पार पाडत असल्याचे पृथ्वी शॉवरील बंदीच्या प्रकरणातून पुन्हा दिसल्याचेच मानले जात आहे. दोन मोसमापूर्वी युसुफ पठाण बंदीच्या कालावधीत दोन रणजी लढती खेळला होता, तर आता पृथ्वी शॉ बंदीच्या कालावधीत आयपीएल खेळला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ "बॅकडेटेड बंदी'च्या नियमाचा सोईस्करपणे फायदा घेत आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या नियमानुसार या प्रकारची बंदी घातल्यास खेळाडूंची कामगिरी त्यातून पूर्णपणे काढून घेण्याचीही सूचना आहे. आता युसुफ पठाणने बंदीच्या कालावधीत केलेल्या दोन शतकांच्या जोरावर बडोद्याने रणजी स्पर्धेत आगेकूच केली होती.

पृथ्वी शॉ तर याच बंदीच्या कालावधीत आयपीएल खेळला. एवढेच नव्हे; तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीग जिंकलेल्या नॉर्थ मुंबई पॅंथर्सचा कर्णधार होता. त्याच्या 61 धावांच्या जोरावर नॉर्थ मुंबई पॅंथर्सने निर्णायक लढतीत 12 धावांनी बाजी मारली होती. आता पृथ्वीची याच सामन्यातील कामगिरी काढून टाकली तर सोबो सुपरसॉनिक्‍स विजेते असल्याचे जाहीर होणार का, हाही प्रश्न विचारला जात आहे. पृथ्वीला बंदीच्या कालावधीत संघासोबत सराव करण्याची परवानगी देण्यात आली. याचाच अर्थ हा बंदीचा फार्सच झाला आहे.

पृथ्वीबरोबरच भारतीय मंडळाने विदर्भचा अक्षय दुल्लारवार दिव्या गजराज याच्यावरही बंदी घातली. गजराजवरील सहा महिन्यांची बंदी 25 सप्टेंबरला संपते; तर दुल्लारवारवरील आठ महिन्यांची बंदी 9 नोव्हेंबरला. या दोघांवरील बंदी संपण्याची हीच तारीख का, हे जाहीर केलेले नाही. त्याचबरोबर बंदी घातलेल्या खेळाडूंच्या कामगिरीचे काही निकाल बाद होतील, असे सांगितले आहे. जागतिक संघटना सर्वच निकाल बाद करते.

पृथ्वी शॉबाबतचे अनुत्तरित प्रश्न
- पृथ्वीने खोकल्याचा त्रास झाल्यावर काय करू, हे वडिलांना का विचारले. मुंबई संघासोबत त्यावेळी डॉक्‍टर, व्यवस्थापक, मार्गदर्शक नव्हते का?
- पृथ्वीने चाचणी देण्यापूर्वी खोकल्यावरील औषध घेतल्याची माहिती दिली होती का?
- पृथ्वीच्या चाचणीत आढळलेल्या उत्तेजकांच्या वापराबद्दल चार वर्षांची बंदी, मग पृथ्वीवर आठच महिने का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bcci just doing formality to ban dop tainted players