बंगालची फिनिक्‍स भरारी; जेतेपदास गवसणी

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले.

अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले.

कोणीही जिंकला तरी अजिंक्‍यपदाचा हा सामना पैसा वसूल करणारा असेल, अशी ग्वाही प्रतिस्पर्धी मार्गदर्शकांनी दिली होती. त्यानुसार पहिल्या डावात संघर्ष झाला; पण बंगालने लय पकडल्यावर दिल्लीचे राज्य खालसा झाले. दिल्लीने यंदाच्या मोसमात साखळीत पहिले स्थान मिळवताना सर्व संघांना हरवले होते. बंगालचा गड त्यांनी साखळीतही भेदला नव्हता आणि अंतिम सामन्यातही ते अपयशी ठरले.

प्रो कबड्डीतही इराणचा ठसा
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची मक्तेदारी इराणने संपवली. आज प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघात भारतीयांनी आपापला ठसा उमटवला; परंतु सर्वांत प्रभावी ठरला तो इराणचा नबीबक्ष. त्याने 13 चढायांत 10 गुण मिळवले. दिल्ली संघात इराणचा मेराज शेख होता; पण राखीव ठेऊन त्याने दोनदाच चढायांसाठी त्याला मैदानात आणले.

एकाकी नवीन कुमार
दिल्लीची सर्व मदार होती नवीन कुमारवर. त्याने स्पर्धेतील 22 वे सुपर टेन केले; पण इतर चढाईपटूंची त्याला साथ मिळाली नाही. दिल्लीच्या 34 गुणांत नवीनचा वाटा 18 गुणांचा होता. दिल्लीचा संघ येथेच कमी पडला. नवीननंतर चंद्रनवर दिल्लीच्या आशा होत्या; पण तो दोनच गुण मिळवू शकला. त्याच्या चार पकडी झाल्या.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंतिम सामन्याची सुरुवात वेगळी होती. पहिल्या चार मिनिटांत तीन पकडी करून दिल्लीने 6-0 आघाडी घेतली आणि सहाव्याच मिनिटाला लोण देत 11-3 अशी आघाडी घेतली. सामना एकतर्फी होण्याची चिन्हे असतानाच बंगालने कलाटणी देण्यास सुरुवात केली. सामन्यातला पहिला गुण मिळवण्यासाठी त्यांना चार मिनिटे लागली; पण लोण स्वीकारल्यानंतर खचून न जाता त्यांनी मुसंडी मारली. नवीनची पकड करून दिल्लीला मोठा धक्का दिला. त्यानंतर सुकेशने चढाईत गुण मिळवले. त्यापेक्षा नबीबक्षने प्रत्येक चढाईत गुणांची वसुली केली आणि बघता बघता दिल्लीवर लोण दिला आणि तेथून बंगालने मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या अर्धात तर दिल्लीवर दोन लोण देत त्यांचा खेळ खल्लास केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bengal won pro kabaddi