esakal | सामना स्थगित होऊनही मेस्सी तासभर मैदानातच; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

सामना स्थगित होऊनही मेस्सी तासभर मैदानातच; जाणून घ्या कार

सामना स्थगित होऊनही मेस्सी तासभर मैदानातच; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साओ पावलो : फुटबॉलविश्वाचे लक्ष लागून राहिलेली अर्जेंटिनाविरुद्ध ब्राझील हा विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतला सामना सुरू झाल्यानंतर वेगळ्याच कारणामुळे स्थगित करण्यात आला. इंग्लंडहून आलेल्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी विलगीकरणाचे नियम न पाळल्यामुळे ब्राझीलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामना स्थगित केला.

एमिलिनो मार्टिनेझ (अॅस्टन व्हिला), क्रिस्टियन रोमेरो आणि गोवानी लो सेल्सो (टॉटेनहॅम) हे इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळलेले अर्जेंटिनाचे खेळाडू यांना बाजूला घेऊन ब्राझीलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मैदानात येऊन त्यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी सामना सुरू होऊन पाच मिनिटांचा खेळ झाला होता.

कोरोनासंदर्भात ब्राझीलने कडक नियम केलेले आहे. त्यांनी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत यांना रेड झोनमध्ये ठेवले आहे. या देशातून येणाऱ्यांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण आवश्यक आहे. ब्राझीलच्या नागरिकांसाठी याच नियमात मात्र सूट आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. आत्तापर्यंत त्यांच्या देशात ५ लाख ८३ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

सामना सुरू झाल्यावर काही लोक मैदानात आले आणि त्यांनी खेळाडूंची चौकशी सुरू केली. त्यामुळे रेफ्रींनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला नेमके कारण कोणालाही समजत नव्हते. दोन्ही संघांचे मार्गदर्शक, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचे काही खेळाडू सामना कशामुळे थांबला आहे, याची माहिती घेत होते.

पाच मिनिटांनंतर सामना थांबवायचाच होता, तर तो सुरूच का केला, या सामन्यासाठी आम्ही तासभर अगोदर स्टेडियममध्ये आलो होतो. तेव्हाच त्यांनी आम्हाला या संदर्भात सांगायला हवे होते, अशी नाराजी मेस्सीने व्यक्त केली. सामना स्थगित करण्यात आला तरी मेस्सी तासभर मैदानातच होता. त्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला.

एकूण चार खेळाडू लंडनहून ब्राझीलमध्ये आले होते. त्यातील तिघांना खेळण्याची संधी मिळाली होती; तर एक जण राखीव होती. या चौघांची वैद्यकीय अधिकारी सातत्याने चौकशी करत होते.अर्जेंटिनाच्या या चौघा खेळाडूंचे विलगीकर करावे, अशी सूचना शनिवारी देण्यात आली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर सामना सुरू झाल्यानंतर तो थांबवण्यासाठी ब्राझीलच्या वैद्यकीय पथकाने पोलिसांचीही मदत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वाचे लक्ष लागून राहिलेल्या हा बहुचर्चित सामना मध्येच थांबवण्यात आल्याची दृश्‍य जगभरातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे ब्राझीलची नाचक्की झाली आहे, अशी टीका ब्राझील फुटबॉल काँफेडरेशनच्या अध्यक्षांनी केली.

मार्गदर्शक म्हणून मी माझ्या खेळाडूंच्या पाठीशी आहे. कोणीही येऊन, ‘आम्ही तुमच्या खेळाडूंना सामन्यातून दूर करत आहोत’, असे सांगू शकत नाही. आमचे हे खेळाडू सामना खेळू शकत नाही, असे आम्हाला कोणीही सांगितले नव्हते, असे अर्जेंटिनाचे मार्गदर्शक लिओनेल स्कालोनी म्हणाले.

ब्राझील, पहिले, अर्जेंटिना दुसरे

विश्वकरंडक पात्रतेच्या या दक्षिण अमेरिकन गटात ब्राझील सहा गुणांसह आघाडीवर आहेत; तर अर्जेंटिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. गटातील अव्वल चार संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.

loading image
go to top