कोल्हापूरच्या पल्लवीची स्पर्धा वेगाशी..!

संदीप खांडेकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

पल्लवीने सहभाग घेतलेल्या स्पर्धा

  •     चेन्नईतील रॉयल रेडिओ स्पर्धेत पहिला क्रमांक.
  •     इंडियन नॅशनल रॅलीमध्ये सहभाग 
  •     डिसेंबर २०१८ मध्ये पुण्यात झालेल्या कार रेसिंग स्पर्धेत मुलांच्या गटातून सहभाग.

कोल्हापूर - पेट्रोलियम इंजिनिअर ते मोटो स्पोर्ट व कार रेसर असा पल्लवी शामराव यादव या युवतीचा प्रवास थक्क करणारा आहे. इराक, दुबई, अमेरिका, कतार येथे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करताना, तिला तिच्या आतील रेसरने स्वस्थ बसू दिले नाही. एखाद्या स्पर्धेत मुलींचा सहभाग कमी असेल तर पुरुषांसोबत रेसिंगमध्ये उतरण्याची हिंमत तिने दाखवली. स्पर्धेतील हार-जीत हा प्रश्न वेगळा आहे. पण, स्पर्धेत उतरून स्वतःला आजमावण्यात काय हरकत आहे, असे ती अभिमानाने सांगते.

अंबाई डिफेन्स परिसरात पल्लवी राहते. होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने राजाराम महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुण्यातून पेट्रोलियम टेक्‍नॉलॉजीची मास्टर डिग्री मिळवली. शालेय जीवनातच तिला रेसिंगचा छंद लागला होता. आशुतोष काळे यांच्याकडे तिने वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने इराकमध्ये चार वर्षे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम केले. त्याचबरोबर दुबई, कतार, अमेरिका व भारतात पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कामातला आनंद तिच्यासाठी मोठा होताच; पण ड्रायव्हिंगचे वेड काही तिच्या मनातून जात नव्हते. त्यासाठी तिने २०११ व्हेस्पा दुरुस्त करून घेतली. 

टू व्हीलर डर्ट बाईक रेसिंगमध्ये तिने सहभाग घेतला. रॉयल रेडिओ ग्रुपतर्फे आयोजित नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या गटात ती उतरली. त्या स्पर्धेत तिची कामगिरी थोडीशी निराशाजनक जरूर राहिली. पण, तिने आत्मविश्वास न गमावता तयारी सुरू ठेवली. पुणे येथे झालेल्या स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक मिळवला. टीव्हीएस फॅक्‍टरी स्पर्धेत तिने आपली चमक दाखवली. चेन्नईत झालेल्या रॉयल रेडिओ स्पर्धेत तिने पहिला क्रमांक मिळवला. इंडियन नॅशनल रॅलीमध्येही तिचा सहभाग राहिला. डिसेंबर २०१८ मध्ये पुण्यात झालेल्या कार रेसिंग स्पर्धेत मुलांच्या गटातून ती उतरली होती.

मोटारसायकल स्पर्धेत कधी प्रथम, तर कार रेसिंग स्पर्धेत चौथे स्थान मिळविणारी पल्लवी कोल्हापुरात झालेल्या डर्ट ट्रॅक स्पर्धेत हमखास उतरली आहे. बंगळूर, पंजाब, चंदीगड, जयपूर, भोपाळ अशा कोणत्याही ठिकाणी स्पर्धा असो, पल्लवी एकटीच स्पर्धेसाठी जाते. भोपाळमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने इव्हेंट कॅटेगरीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आई कमल यांचा अपघात झाल्यानंतर ती अस्वस्थ झाली. ती कोल्हापुरात परतली. पण, स्वत:ला सावरत तिने खंड पडू दिला नाही. तिचा मोठा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर असून, दुसरा पोलिस दलात कार्यरत आहे. 

फिजिकल फिटनेस महत्त्वाचा
रेसिंगसाठी फिजिकल फिटनेस फार महत्त्वाचा ठरतो. विशेषतः पुरुषांसोबत स्पर्धेत उतरायचे असेल तर कस लागतो. आपल्याकडे रेसिंगमध्ये उतरण्याचे मुलींचे प्रमाण अत्यल्प असल्याने पुरुषांसोबत स्पर्धेत उतरण्याखेरीज पर्याय राहत नाही, असे पल्लवी सांगते. 

पल्लवीने सहभाग घेतलेल्या स्पर्धा

  •     चेन्नईतील रॉयल रेडिओ स्पर्धेत पहिला क्रमांक.
  •     इंडियन नॅशनल रॅलीमध्ये सहभाग 
  •     डिसेंबर २०१८ मध्ये पुण्यात झालेल्या कार रेसिंग स्पर्धेत मुलांच्या गटातून सहभाग.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car racer Pallavi Shamrao Yadav interview