तीन गोलच्या पिछाडीनंतर चेल्सीची बरोबरी

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

चेल्सीने 1-4 पिछाडीनंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ऍजॅक्‍सला 4-4 रोखण्यात यश मिळवले. त्याच वेळी पिछाडीनंतर बोरुसिया डॉर्टमंडने इंटर मिलानचा पाडाव केला; तर व्हॅलेन्सियाने चमकदार लक्षवेधक विजय मिळवताना लिलीला नमवले.

लंडन : चेल्सीने 1-4 पिछाडीनंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ऍजॅक्‍सला 4-4 रोखण्यात यश मिळवले. त्याच वेळी पिछाडीनंतर बोरुसिया डॉर्टमंडने इंटर मिलानचा पाडाव केला; तर व्हॅलेन्सियाने चमकदार लक्षवेधक विजय मिळवताना लिलीला नमवले.

उत्तरार्धातील दहाव्या मिनिटास ऍजॅक्‍सने 4-1 आघाडी घेतली. त्यातच पूर्वार्धात चेल्सीने दिलेल्या स्वयंगोलाचीही चर्चा सुरू झाली. चेल्सीने पिछाडी दोन गोलची केल्यावरही त्यांची बरोबरी कोणी गृहीत धरत नव्हते. उत्तरार्धाच्या मध्यास रेफरींनी ऍजॅक्‍सच्या दोन खेळाडूंना बाहेर काढत चेल्सीला संजीवनी दिली. त्यातच ऍजॅक्‍सच्या बचावपटूचा हात चेंडूला लागला. काही वेळातच झालेल्या 4-4 बरोबरीनंतर चेल्सीचा गोल अवैध ठरवण्यात आला आणि सामना अखेर बरोबरीत सुटला. त्यातच या गटात जास्त रंग भरताना व्हॅलेन्सियाने लिलीचा 4-1 पाडाव केला. त्यामुळे आता चेल्सी, ऍजॅक्‍स आणि व्हॅलेन्सियाचे समान गुण झाले आहेत.

प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर सिटीविरुद्धची लढत लक्षात घेऊन गतविजेत्या लिव्हरपूलने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे त्यांना गेंकविरुद्ध निसटत्या 2-1 विजयावर समाधान मानावे लागले. विजयाचे लक्ष्य साध्य झाले असे सांगत लिव्हरपूल मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी याबाबतची चर्चा टाळली. दोन गोलच्या पिछाडीनंतर डॉर्टमंडने साल्झबर्गचा 3-2 पाडाव केला.

घरच्या मैदानावर बार्सिलोनाची पाटी कोरी
बार्सिलोनाला घरच्या मैदानावर स्लाविया प्रागविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. सात वर्षांत प्रथमच बार्सिलोनाला घरच्या मैदानावर गोल करू शकले नाहीत. लिओनेल मेस्सीचा पूर्वार्धातील गोलचा थोडक्‍यात हुकलेला प्रयत्न सोडल्यास बार्सिलोनास आक्रमणासाठी झगडावेच लागले. ला लिगामध्ये लेवांतेविरुद्धच्या पराभवानंतरच्या या बरोबरीने बार्सिलोना संघ नक्कीच खचल्याचे दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chelsea draw level after trailing 3 goals