पाऊस नव्हे, रायुडू बरसला अंबातीचे नाबाद शतक, चेन्नईचा सहज विजय

रविवार, 13 मे 2018

संक्षिप्त धावफलक : 
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 4 बाद 179 (शिखर धवन 79 - 49 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 51 - 39 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, दीपक हुड्डा 21 - 11 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, दीपक चहर 1-16, शार्दुल ठाकूर 2-32, ड्‌वेन ब्राव्हो 1-39) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : 19 षटकांत 2 बाद 180 (शेन वॉट्‌सन 57 - 35 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, अंबाती रायडू नाबाद 100 - 62 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार,) 

पुणे - यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अंबाती रायुडूने आतापर्यंत अचूक ठरलेल्या हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत चेन्नई सुपर किंग्जला रविवारी सोपा विजय मिळवून दिला. चेन्नईने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळविला. 

असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मात्र, पुण्यापासून जवळच असणाऱ्या गहुंजेत पावसाने कृपादृष्टी केली. सामन्या दरम्यान पावसाने हजेरी लावली नसली, तरी रायुडू असा काही बरसला की त्याने 62 चेंडूंत प्रत्येकी सात चौकार, षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 179 धावा केल्या. चेन्नईने 19 षटकांत 2 बाद 180 धावा करून विजयला गवसणी घातली. 

आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला या वेळी शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तुफान सुरवात करून दिली. पावसाळी हवा आणि त्यामुळे डोक्‍यावर बसणारे डकवर्थ-लुईसचे भूत लक्षात घेऊन त्यांनी स्विकारलेले आक्रमक धोरण सार्थच होते. वॉटसन-रायुडू यांनी षटकारांची आतषबाजी करत पाचव्या षटकांत अर्धशतक धावफलकावर झळकावले. त्यानंतर शतकी भागीदारी ओलांडल्यावरही ही जोडी अभेद्य होती. दहाची धावगती राखूनही एक वेळ आवश्‍यक धावगती काही काळ वाढली होती. मात्र, ही जोडी खेळत असल्याने चेन्नईला चिंता नव्हती. अशाच वेळी वॉटसन धावबाद झाला आणि रैनाला आततायीपणा भोवला. दोन गडी झटपट बाद झाल्यावर कर्णधार धोनीने रायुडूला जणू सर्वाधिकार दिले. त्यानेही विश्‍वास सार्थ ठरवत आधी शतक आणि नंतर विजय अशा दोन्ही गोष्टी जुळवून आणल्या. 

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या हैदराबादला पुन्हा एकदा शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यम्सनच्या भागीदारीचा आधार मिळाला. ऍलेक्‍स हेल्स लवकर बाद झाल्यावर एकत्र आलेल्या या जोडीने संघाचे आव्हान उभे केले असले, तरी त्यांची सुरवात संथ होती. पॉवर प्लेमध्ये त्यांना 29 धावांच करता आल्या. उलट चेन्नईने याच कालावधीत 85 धावा फटकावल्या आणि हाच या सामन्याचा निर्णय ठरवणारा क्षण ठरला. अर्धशतक झळकावून धवन, विल्यम्सन बाद झाल्यावर हैदराबादच्या धावसंख्येवर मर्यादा आल्या. अखेरच्या दोन षटकांत दीप हुडाच्या फटकेबाजीने त्यांना आव्हान पावणे दोनशेच्या पुढे नेता आले. 

संक्षिप्त धावफलक : 
सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 4 बाद 179 (शिखर धवन 79 - 49 चेंडू, 10 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 51 - 39 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, दीपक हुड्डा 21 - 11 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, दीपक चहर 1-16, शार्दुल ठाकूर 2-32, ड्‌वेन ब्राव्हो 1-39) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : 19 षटकांत 2 बाद 180 (शेन वॉट्‌सन 57 - 35 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, अंबाती रायडू नाबाद 100 - 62 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार,) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chennai wins match