
भारताविरूद्धचं त्याचं शतक अजूनही चाहत्यांना लक्षात आहे
ICCच्या 2000-01 मध्ये झालेल्या Knockout स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. फायनलमध्ये भारताने अत्यंत चांगली खेळी करत २६४ धावा केल्या होत्या. सौरव गांगुली (११७) आणि सचिन तेंडुलकर (६९) यांनी सर्वोत्तम खेळी केल्या होत्या. पण न्यूझीलंडकडून दमदार शतक झळकावणाऱ्या (१०२) क्रिस केन्सने संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र हा माजी खेळाडू आज लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असल्याची माहिती आहे.
क्रिस केन्स हा न्यूझीलंडचा उत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक. मात्र सध्या तो प्रकृतीच्या तक्रारींशी झुंजतोय. क्रिस केन्सला श्वासोच्छवासाचा प्रचंड त्रास (aortic dissection) होत असल्याने त्याला रूग्णालयात हलवण्यात आला आहे. कॅनबेराच्या एका रूग्णालयात त्याला गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा शरीरातील धमन्यांमध्ये काही बिघाड (tear of the inner layer of the body's main artery) झाल्याने त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आल्याचे सांगितले.
कॅनबेरातील हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण त्या शस्त्रक्रियांना त्याने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, त्याला लवकरच सिडनीच्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार असल्याचेही सांगत आहेत. क्रिस केन्सच्या ६२ कसोटी, २१५ वन डे आणि २ टी२० सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे.