भारताचे मन वळवण्यासाठी संयोजकांचा संघटनेवर नेम?

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नाही तर भारत नाही, ही ठाम भूमिका भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतल्यानंतर स्पर्धा-संयोजक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या स्पर्धेत नेमबाजी नसण्यास जागतिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नाही तर भारत नाही, ही ठाम भूमिका भारतीय ऑलिंपिक संघटनेने घेतल्यानंतर स्पर्धा-संयोजक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी या स्पर्धेत नेमबाजी नसण्यास जागतिक संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या रायफल; तसेच पिस्तूल प्रकारातील स्पर्धा घेण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव जागतिक नेमबाजी संघटनेकडे पाठवला होता. मात्र तो संघटनेने फेटाळला, असा दावा राष्ट्रकुल स्पर्धा संयोजन समितीचे सीईओ इयान रीड यांनी केला. जागतिक संघटनेचे सचिव ऍलेक्‍झांडर रॅटनर यांनी यात तथ्य नसल्याचे सांगताना राष्ट्रकुल क्रीडा संयोजकांनी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे सांगितले.

आम्ही सप्टेंबरमध्ये नेमबाजी, तिरंदाजी, बीच व्हॉलीबॉल, पॅरा टेबल टेनिस, क्रिकेटबाबत विचार करण्याचे ठरवले. त्यानुसार विविध पर्याय विचारात घेतले. नेमबाजीसाठी जागेचा प्रश्न होता. त्यावेळी रायफल आणि पिस्तूलच्या स्पर्धाच घेण्याचे सुचवल्यावर जागतिक; तसेच ब्रिटिश संघटनेने यास सहमती दिली नाही, असे संयोजक सांगत आहेत; मात्र नेमबाजी संघटनेचे पदाधिकारी याबाबत चर्चा करण्यात आली, पण कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commonwealth game organiser target world shooting federation to woo india