Commonwealth Games 2022 : भारतीय संघाची लागणार कस; ऑस्ट्रेलियाशी रंगणार सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND-W vs AUS-W Commonwealth Games 2022

Commonwealth Games 2022: भारतीय संघाची लागणार कस; ऑस्ट्रेलियाशी रंगणार सामना

IND-W vs AUS-W Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर महिलांच्या टी-20 सामान्यांनी स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होते आहे आणि पहिलीच लढत ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांदरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय मंडळांनी या प्रसंगाचे औचित्य लक्षात घेऊन संपूर्ण ताकदीचे संघ स्पर्धेत उतरवले असल्याने सामने रंगणार, अशी आशा निर्माण झाली आहे.

‘भारतीय संघ इंग्लंडला येऊन मित्रत्वाचे सामने खेळून आणि सराव करून स्पर्धेकरिता सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच तगडा आहे आणि आमची परीक्षा बघितली जाणार आहे. आमची सर्व ताकद या सामन्यामागे लागेल आणि जर सर्वोत्तम खेळ केला तरच ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा धक्का आम्ही देऊ शकतो याची आम्हाला कल्पना आहे,’ असे भारतीय संघाची कप्तान हरमनप्रीत कौर सामन्याअगोदर पत्रकारांशी बोलताना म्हणाली.

ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व अनुभवी आणि दमदार खेळाडू मेग लॅनिंग करणार आहे. भाताची फलंदाजी कदाचित ऑस्ट्रेलियन संघाच्या तोडीस तोड कामगिरी करू शकते; पण गोलंदाजीच्या प्रांतात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय माऱ्यापेक्षा चांगलाच मजबूत आहे. बिग बॅश लीग खेळून ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू टी-20 क्रिकेट खेळण्याच्या बाबतीत तरबेज असल्याने खरे सांगायचे झाले तर त्यांची बाजू वरचढ वाटते. स्मृती मानधना आणि कप्तान हरमनप्रीत कौरला फलंदाजी करताना जबाबदारी पेलून खूप मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान खुणावत आहे. भारतीय संघाच्या यशाचा तोच एक राजमार्ग दिसतो आहे.