राष्ट्रकुल नेमबाजीचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दॅमे लुईस मार्टिन यांनी बर्मिंगहॅम स्पर्धेत नेमबाजी नसणारच हे सांगितल्यामुळे आता हा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता आहे. नेमबाजी नसेल तर भारतीय संघ नाही, अशी भूमिका घेतल्याने आता आगामी काही दिवसांत याबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबई / लंडन : राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष दॅमे लुईस मार्टिन यांनी बर्मिंगहॅम स्पर्धेत नेमबाजी नसणारच हे सांगितल्यामुळे आता हा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता आहे. नेमबाजी नसेल तर भारतीय संघ नाही, अशी भूमिका घेतल्याने आता आगामी काही दिवसांत याबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी नसल्यामुळे आता होणाऱ्या परिणामाबद्दल भारत आणि ब्रिटन सरकारची एकमेकांबरोबर चर्चा होईल असे मानले जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी कधीही सक्तीचा क्रीडा प्रकार नव्हता, असा दावा मार्टिन यांनी केला. राष्ट्रकुल क्रीडा संयोजकांनी पिस्तूल आणि रायफल प्रकाराच्या स्पर्धा घेण्याची तयारी दाखवली, पण जागतिक संघटनेस सर्व प्रकार हवे होते असाही दावा केला जात आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवरील संभाव्य बहिष्काराबद्दल भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांची भेट घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मार्टिन भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर ब्रिटनचे नवे क्रीडा मंत्री निगेल ऍडम्स यांचीही भेट घेणार आहेत.

बहुविध क्रीडा स्पर्धेतील समावेश प्रत्येक खेळाने मिळवणे आवश्‍यक असते. नेमबाजी हा राष्ट्रकुलातील सक्तीचा क्रीडा प्रकार नाही. आपल्याला हे स्वीकारावे लागेल. नेमबाजी स्पर्धेत असणार नाही. आता यापुढे त्यास जागा नसेल असे मार्टिन यांनी सांगितले. बर्मिंगहॅमने स्पर्धेची तयारी दाखवली त्या वेळी त्यात नेमबाजीला स्थान नव्हते. तसेच सर्वंकष विचार केल्यावर नेमबाजी आणि तिरंदाजीऐवजी महिला ट्‌वेंटी 20, पॅरा टेबल टेनिस आणि बीच व्हॉलीबॉल याचा समावेश करण्यात आला.

दृष्टिक्षेपात स्पर्धा
- या स्पर्धेत महिला क्रीडापटूंची संख्या पुरुषांपेक्षा जास्त, त्याचबरोबर पॅरा स्पोर्टस्‌ही वाढले
- महिला ट्‌वेंटी 20 समावेश स्पर्धेतील महिला क्रीडापटूंची संख्या वाढणार, या स्पर्धेत आठ संघ
- महिलांच्या क्रीडा प्रकारात पुरुषांच्या स्पर्धेपेक्षा दोन पदके जास्त
- महिलांच्या स्पर्धेत एकंदर 135 पदके
- सात मिश्र स्पर्धांचा समावेश, आठ पॅरा स्पोर्टस्‌मध्ये स्पर्धा
- स्पर्धेत 19 क्रीडा प्रकारांत साडेचार हजार क्रीडापटूंचा सहभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commonwealth games can't accomodate shooting