राष्ट्रकुल स्पर्धा बिनकामाची

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला काहीही दर्जा नाही. त्यात सहभागी झाल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या स्पर्धेऐवजी विश्‍वकरंडक तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याचा जास्त फायदा होऊ शकेल, अशी परखड टिपण्णी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला काहीही दर्जा नाही. त्यात सहभागी झाल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या स्पर्धेऐवजी विश्‍वकरंडक तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याचा जास्त फायदा होऊ शकेल, अशी परखड टिपण्णी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार नसल्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा भारत विचार करीत आहे. ब्रिटिशांचे गुलाम असलेल्या देशांच्या या स्पर्धेत खेळल्याचा फायदा काय, अशी विचारणाच आता बत्रा करीत आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला दर्जाच कुठे आहे. आपण या स्पर्धेत 70-100 पदके जिंकतो आणि मग ऑलिंपिकमध्ये दोन पदकेच जिंकता येतात. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा विश्‍वकरंडक आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जास्त चुरस असते. 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजकांनी नेमबाजीची स्पर्धा घेण्यासाठी 2 कोटी 20 लाख पौंड खर्च केले आणि आता त्यांच्याकडे स्पर्धा घेण्यासाठीही पैसे नाहीत. पैसे नाहीत तर वेळ कशाला घालवता. स्पर्धा घेणे म्हणजे काही जोक नाही, असे बत्रा म्हणाले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबतचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. त्या स्पर्धेत खेळू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबतचा निर्णय भारतीय ऑलिंपिक संघटना तसेच केंद्र सरकार घेईल, पण मी मत स्पष्टपणे मांडतो, असे बत्रा यांनी सांगितले.

ते म्हणाले, आपल्याला देशातील खेळाचा दर्जा उंचवायचा असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. आपण काही कोणालाही आनंदीत करण्यासाठी नाही. आपण खूप पूर्वी ब्रिटिश सत्तेचे गुलाम होतो, पण आता नाही. ब्रिटिशांची हुकूमत असलेले 30 देश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळत नाहीत. याबाबतचा निर्णय सरकारचा असेल. आपल्याला ऑलिंपिकमध्ये प्रगती करायची असेल, तर राष्ट्रकुल स्पर्धेने काहीही साधणार नाही.

भारतीय ऑलिंपिक संघटना अध्यक्षांचे बोल...
- एक राज्य एक मत यावर आम्ही ठाम
- सरकारी कर्मचारी क्रीडा संघटनांचे मतदार असण्यास विरोध
- क्रीडा महासंघाच्या निवडणुका नियमितपणे होण्याची गरज, तसेच राज्य संघटनाच मतदार असणार
- टोकियो ऑलिंपिकमध्ये किमान दहा पदकांचे लक्ष्य
- आमचे 2026 च्या युवा ऑलिंपिक तसेच 2032 च्या ऑलिंपिकसाठी प्रयत्न करण्याचे लक्ष्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commonwealth games is waste of time and money