परस्परविरोधी हितसंबंधांचा प्रशिक्षक निवडीत अडथळा?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतरही त्यातील अडथळा संपलेला नाही. कपिलदेव अध्यक्ष असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीस आता परस्परविरोधी हितसंबंधांबाबत माहिती देण्यास भारतीय मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांनी सांगितले असल्याचे समजते.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षक निवडीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतरही त्यातील अडथळा संपलेला नाही. कपिलदेव अध्यक्ष असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीस आता परस्परविरोधी हितसंबंधांबाबत माहिती देण्यास भारतीय मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांनी सांगितले असल्याचे समजते.

क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांबाबत माहिती देण्यास तातडीने सांगितले आहे. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी लागेल, त्यामुळे ही माहिती लवकरात लवकर जाहीर करावी, असे या सदस्यांना कळवले असल्याचे वृत्त आहे.

क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांना याबाबतचा ई-मेल काही दिवसांपूर्वीच पाठवण्यात आला आहे, पण त्यातील कोणीही याबाबत अद्याप उत्तर दिलेले नाही. समितीतील सर्व सदस्य माजी क्रिकेटपटू आहेत. ते आपल्या कामात नक्कीच व्यग्र असतील. काही समालोचक आहेत, काही मार्गदर्शक आहेत; तर काहींची अकादमी आहे. सध्या तरी आम्ही पर्यायांचा विचार केलेला नाही. त्यांच्याकडून उत्तर आल्यावरच काय ते ठरेल, असे भारतीय मंडळातील सूत्रांनी सांगितले.

भारतीय मंडळातील काहींनी या समितीची नियुक्ती नियमानुसार आहे का, हा प्रश्‍न विचारला आहे. मंडळाच्या घटनेनुसार या समितीची नियुक्ती केवळ वार्षिक सर्वसाधारण सभेतच करता येते. सध्या तरी हा विरोधी गट काय होत आहे याची प्रतीक्षा करीत आहे. कपिलदेव अध्यक्ष असलेल्या या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conflict of intreset of CAC member may delay coach selection