esakal | मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल!
sakal

बोलून बातमी शोधा

Argentina vs Brazil

मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Copa America 2021 Final : घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत विजेत्या ब्राझीलला नमवत मेस्सीच्या अर्जेंटिनाने नवा इतिहास रचला. 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ज्यूनियर नेमारच्या ब्राझीलला 1-0 असे पराभूत करत अर्जेंटिनाने बाजी मारली. डी मारियाने 21 व्या मिनिटाला डागलेला गोल निर्णायक ठरला. त्याच्या या गोलमुळे मेस्सीचं स्वप्न साकार झालं. यापूर्वी 1993 मध्ये मॅक्सिकोला पराभूत करत अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिकंली होती. (Copa America 2021 Final Lionel Messis Argentina Beat 1-0 Brazil And Win Trophy Angel Di Maria Hero Of Match)

त्यानंतर चार वेळा (3 कोपा अमेरिका, 1 वर्ल्ड कप) स्पर्धेत अर्जेंटिनाच्या पदरी निराशा आली होती. पाचव्यांदा त्यांना मोठी स्पर्धा जिंकण्यात यश आले. गत विजेत्या ब्राझील विरुद्धच्या फायनल लढतीत पहिल्याच हाफमध्ये मेस्सीच्या अर्जेंटिनाने 1-0 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. कोपा अमेरिकेच्या यंदाच्या हंगामात 10 संघ सहभागी झाले होते.

दोन वेगवेगळ्या गटातून फायनलमध्ये पोहचलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यात माराकाना स्टेडियमवर फायनल सामना रंगला होता. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 4 गोल करणाऱ्या मेस्सीला अखेरच्या सामन्यात गोल डागता आला नाही. पण देशासाठी मोठी स्पर्धा न जिंकण्याचा त्याच्यावरील ठपका या विजयाने पुसला गेलाय. मेस्सीने अर्जेंटिनाकडून 4 वर्ल्ड कप आणि 6 कोपा अमेरिकन स्पर्धेत भाग घेतला. मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर मेस्सीने देशासाठी मोठी ट्रॉफी जिंकून दिली.

अर्जेंटिनाचा विक्रमी विजय

ब्राझीलच्या मैदानात रंगलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या 47 व्या हंगामातील विजयासह अर्जेंटिनाने सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. आतापर्यंत उरुग्वेनं सर्वाधिक 15 वेळा जेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाच्या नावेही आता 15 जेतेपदाची नोंद झाली आहे. यापाठापाठ ब्राझीलचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी एकूण 9 वेळा कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे.

मेस्सीची रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी

फुटबॉलच्या जगतात मेस्सी आणि रोनाल्डो या दोन नावांची आपण चर्चा नेहमीच ऐकतो. क्लबकडून भरमसाठ गोल केलेल्या या खेळाडूंना देशाकडून प्रतिनिधीत्व करताना लक्षवेधी खेळी करण्यात अपयश आले होते. 2016 मध्ये युरो कप स्पर्धा जिंकून देत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या नावे मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यापाठोपाठ आता लिओनेल मेस्सी याने अर्जेंटिनाला कोपा अमेरिका ही स्पर्धा जिंकून दिलीये. दोघांनीही आपापल्या संघाला 1-1 मोठी स्पर्धा जिंकून दिली आहे.

loading image