2028 Olympics : क्रिकेट आता वैश्विक खेळ; लॉस एंजेलिसला २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये समावेश

ट्वेन्टी-२० प्रकारात क्रिकेट ऑलिंपिकमध्ये खेळला जाणार
2028 Olympics
2028 Olympicssakal

मुंबई : क्रिकेट आता खऱ्या अर्थाने वैश्विक खेळ झाला आहे. २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट या खेळाचा आज अधिकृतपणे समावेश करण्यात आला. १२८ वर्षांनंतर क्रिकेट पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये असणार आहे.

ट्वेन्टी-२० प्रकारात क्रिकेट ऑलिंपिकमध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेटसह स्क्वॉश, बेसबॉल/ सॉफ्टबॉल आणि फ्लॅग फुटबॉल या खेळांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या १४४ व्या अधिवेशनात करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी क्रिकेटसह इतर खेळांच्या समावेशाची घोषणा केली. क्रिकेट खेळाच्या समावेशासाठी इतर सदस्यांनी केलेल्या मागणीला हात उंचावून मान्यता देण्याची औपचारिकता झाली आणि त्यानंतर क्रिकेटचे १२९ वर्षांनंतरचे पुनरागमन निश्चित झाले.

वास्तविक २०२८ मधील ऑलिंपिकमध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारशीला ९९ सदस्यांच्या आयओसी सदस्यांतील केवळ दोन सदस्यांचा विरोध होता.

इटलीचे माजी ऑलिंपिक विजेते नेमबाज आणि आता लॉस एंजेलिस ऑलिंपिक समितीचे संचालक निक्कोलो कॅम्पियानी यांनी आयओसीच्या बैठकीत क्रिकेटच्या समावेशासाठी `बॅटिंग` करताना विराट कोहलीच्या सर्व स्तरावरील लोकप्रियतेचा उल्लेख केला.

जो खेळ जगात दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय आहे आणि त्याचे जगात २.६ अब्ज लोक फॉलोअर्स आहेत अशा क्रिकेट खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे, असे निक्कोलो कॅम्पियानी यांनी सांगितले.

विराट कोहली क्रिकेट विश्वाचा चेहरा

इतकेच नव्हे तर पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धेची विश्वकरंडक स्पर्धाही होत आहे. या व्यतिरिक्त युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे अतिशय सक्षम असा डिजिटल प्लॅटफॉर्मही आहे, असे सांगताना कॅम्पियानी पुढे म्हणतात,

माझा मित्र विराट कोहली हा संपूर्ण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे. सोशल मीडियावरील सर्व माध्यमांतून त्याचे ३४ कोटी फॉलोअर्स आहेत. ही संख्या ली ब्रोन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वूडस् पेक्षाही अधिक आहे.

क्रिकेटचा समावेश होणे हा क्रिकेट क्षेत्राचाच नव्हे तर लॉस एंजेलिस आणि आयओसी यांचाही विजय आहे. क्रिकेट खेळ खेळणाऱ्या पारंपरिक देशांच्या पुढे जाऊन आता इतर देशांसाठीही क्रिकेटचे मैदान खुले होईल, अशी स्तुती कॅम्पियानी यांनी केली.

बीसीसीआयचे पाठबळ

  • क्रिकेटचे सर्वाधिक चाहते भारतात आहेत आणि सर्वाधिक लोकप्रिय असा खेळ आहे. ऑलिंपिक प्रवेशासाठी आयसीसीने केलेल्या प्रयत्नांना भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआयचे) मोठे पाठबळ होते.

  • बीसीसीआयचे पाठबळ असल्यामुळेच क्रिकेटचे ऑलिंपिकमधील पुनरागमन झाले आहे आणि त्यासाठी बीसीसीआयची बदललेली भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

  • आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धांमधील क्रिकेटमध्ये बीसीसीआय आपला संघ पाठवत नव्हते; परंतु २०२१ मध्ये त्यांनी भूमिकी बदलली आणि `मैदानात` उतरण्याचे ठरवले आणि हांग् चौऊ येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला क्रिकेटचे विजेतेपदही मिळवले.

अमेरिकेशी संबंधित आणि अमेरिकेत वाढती लोकप्रियता असलेल्या खेळांचा आम्ही समावेश करताना विचार केला, या खेळांमुळे ऑलिंपिक चळवळ अधिक व्यापक होईल.

- थॉमस बाख, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com