Akram slams Team India | T20 WC: "भारताला वाटतं IPL म्हणजे..."; वासिम अक्रमचा BCCI टोमणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim-Akram-team-India

भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पत्करावा लागला मोठा पराभव | T20 World Cup 2021

T20 WC: "भारताला वाटतं IPL म्हणजे..."; वासिम अक्रमचा टोमणा

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आधी पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघ दोन्ही सामन्यात हतबल झालेली दिसली. फलंदाजीत रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा हे सारे अपयशी ठरले. विराटने एक झुंजार अर्धशतकी खेळी केली, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. गोलंदाजीतही भारताला पाकिस्तानचा एकही बळी घेता आला नाही. न्यूझीलंडविरूद्धदेखील दोन्ही बळी बुमराहलाच मिळाले. बाकीचे गोलंदाज उपाशीच राहिले. भारताच्या या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा वासिम अक्रम याने टीम इंडिया आणि BCCI ला टोमणा मारला.

"भारतीय संघ शेवटची टी२० क्रिकेट मालिका मार्च महिन्यात खेळला. आता आपण नोव्हेंबर महिन्यात आहोत. सहा महिन्यात भारतीय संघाने कोणतीही टी२० क्रिकेट मालिका खेळली नाही. यावरून असं दिसतं की भारतीय क्रिकेटर्स हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांबाबत गंभीर नाहीत. त्यांना असं वाटतं की IPL हाच क्रिकेटचा प्रकार पुरेसा आहे", असे ताशेरे वासिम अक्रम याने BCCI आणि टीम इंडियावर ओढले.

Wasim-Akram

Wasim-Akram

"तुम्ही जगभरातील कोणत्याही प्रकारच्या टी२० लीग स्पर्धा खेळा, त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकासा उपयोग होत नाही. कारण लीग क्रिकेटमध्ये विरोधी संघात एक-दोन चांगले गोलंदाज असतात पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात मात्र पाचही गोलंदाज हे प्रभावी आणि सर्वोत्तम असतात. अशा वेळी भारतीय खेळाडूंची तारांबळ उडते यात काहीच नवल नाही", असा टोलादेखील अक्रमने लगावला.