T20 WC Final आयुष्यात पहिल्यांदाच स्टार्कची वाईट धुलाई, नावे झाला नकोसा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mitchell starc
स्टार्कने या सामन्यात 4 षटकांच्या कोट्यात 60 धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

T20 WC Final आयुष्यात पहिल्यांदाच स्टार्कची वाईट धुलाई

T20 WC Final AUS vs NZ: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल लढतीत ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्कची (Mitchell Starc) चांगलीच धुलाई झाली. केन विल्यमसनने त्याच्या दोन षटकात 39 धावा कुटल्या. न्यूझीलंडच्या डावातील 11 व्या षटकात केन विल्यमसन आणि स्टार्क समोरासमोर आले. यात त्याने 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर 16 व्या षटकात विल्यमसनने 22 धावा घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाजाचा विल्यमसनने चांगलाच समाचार घेतला. स्टार्कने या सामन्यात 4 षटकांच्या कोट्यात 60 धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

स्टार्कच्या अख्ख्या टी20 कारकिर्दीतील महागडी गोलंदाजी

मिशेल स्टार्कच्या टी-20 कारकिर्दीत तो पहिल्यांदाच एवढा महागडा ठरलाय. या कामगिरीमुळे एका सामन्यात कोट्यात सर्वाधिक धावा देणारा तो चौथा गोलंदाज ठरलाय. यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 4 षटकात 60 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ या यादीत केनियाचा लॅंमेक ओन्यांगो नोगेचे याचा समावेश आहे. त्याने 2007 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 61 धावा खर्च केल्या होत्या. बांगलादेशच्या मोर्तुजाने 2014 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 4 षटकात 63 धावा खर्च केल्या होत्या. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात महागडे स्पेल हे सनथ जयसुर्याच्या नावे आहे. त्याने 2007 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 4 षटकांच्या कोट्यात 64 धावा खर्च केल्या होत्या.

केन विल्यमसनचा धमाका

सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर केन विल्यमसनने कर्णधाराला साजेसा खेळ केला. त्याने 48 चेंडूत 85 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 172 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ पहिल्या 10 षटकात धावांसाछी संघर्ष करताना दिसले. केन विल्यमसनच्या खेळीच्या जोरावर अखेरच्या 10 षटकात न्यूझीलंडने 115 धावा केल्या.

loading image
go to top