T20 WC : सेमी फायनलमध्ये 2019 वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक! VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ENG vs NZ
T20 WC : सेमी फायनलमध्ये 2019 वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक! VIDEO

T20 WC : सेमी फायनलमध्ये 2019 वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक! VIDEO

अबूधाबीच्या मैदानात न्यूझीलंडने लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवाची परतफेड केली. या सामन्यात निशमने आपल्या त्या षटकाराचीही परतफेड केली. न्यूझीलंडला सेमी फायनलचे तिकीट मिळवून देण्यात मिशेलचे अर्धशतक जितके महत्त्वपूर्ण आहे तितकाच मोलाचा वाटा हा जेम्स निशमच्या फटकेबाजीचा आहे. त्याच्या अल्प पण मॅच विनिंग खेळीतील एक षटकार हा क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या क्रिकेटच्या इतिहासातील अवस्मरणीय सामन्याची आठवण करुन देणारा होता.

न्यूझीलंडच्या डावातील सतराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर नीशमने लॉन्ग ऑनच्या दिशेनं उत्तुंग फटका मारला. सीमारेषेवर जॉनी बेयरस्टोनं अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत हा फटका झेलमध्ये रुपांतरीत करण्याच पुरेपूर प्रयत्न केला. सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू रोखून बेयरस्टोनं तो लिविंगस्टोनच्या हाती फेकला पण यावेळी बेयरस्टोचा पाय सीमारेषेला लागल्यामुळे हा षटकार देण्यात आला. मॅचच्या टर्निंग पाँइटमधील हा एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये असाच सीन घडला होता. लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना खेळवला गेला होता. यावेळी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडने दिलेल्या 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. इंग्लंडच्या डावातील 49 व्या षटकातील नीशमच्या 4 थ्या चेंडूवर बेन स्टोक्सने षटकार मारला होता. यावेळी बोल्टने कॅच घेतला सीमारेषेवर आपला तोल जातोय हे लक्षात आल्यानंतर त्याने गप्टीलकडे चेंडू फेकलाही पण बोल्टचा पाय सीमारेषेला लागल्यामुळे तो षटकार ठरला. आणि न्यूझीलंडने हातची मॅच सोडली. याच षटकातील अगोदरच्या चेंडूवर बोल्टने प्लंकेटचा कॅच घेतला होता. स्टोक्सचा कॅच जर झाला असता तर वर्ल्ड कपची ट्रॉफी न्यूझीलंडची झाली असती. यावेळी तसाच क्षण पाहायला मिळाला. फरक फक्त एवढाच होता की बॉलिंग करणारा नीशम बॅटिंग करत होता आणि त्यावेळी निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला होता आज न्यूझीलंडच्या बाजूनं निकाल झुकल्याचे पाहायला मिळाले.

2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांच्या धावफलकावर सेम टू सेम धावा दिसल्या. क्रिकेटच्या इतिहासातील हा कमालीचा योगायोग होता. बाउंड्री काउंटच्या नियमानुसार, इंग्लंडला विजेता घोषीत करण्यात आले होते.

loading image
go to top