
Dilip Vengsarkar in Dream 11 cup : ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे म्हणजे तुम्हाला आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. अशा संधी आयुष्यात फार कमी वेळा मिळतात कारण या स्पर्धेमुळे तुम्हाला चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी तर मिळतेच शिवाय कितीतरी माजी क्रिकेटपटू आणि एम.सी.ए. तील पदाधिकाऱ्यांसमोर आपला सर्वोत्तम खेळ करण्याची संधी तुम्हाला मिळते. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात छोट्या खेळाडूंना संबोधित करताना सांगितले. ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या या समारंभात एम.सी.ए.चे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना वेंगसरकर हे मुंबईतील छोट्या खेळाडूंसाठी करीत असलेले कार्य खरोखरच गौरवास्पद असल्याचे सांगितले. या स्पर्धेत जी.पी.सी.सी.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय संघाने अमेय क्रिकेट अकादमी संघावर ८० धावांनी मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.