

India vs England Test Series: गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणात, मार्गदर्शनात भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर मोहर उमटवली. यामुळे भारतीय संघाचे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील अपयश मागे टाकले गेले; मात्र या यशाने हुरळून न जाता भारतीय संघाला पुढील दोन वर्षांची आखणी करावी लागणार आहे. गुरू गौतम गंभीर यांच्यासाठीही २०२५ ते २०२७ या दोन वर्षांचा काळ कस पाहणारा ठरू शकणार आहे. आयपीएलनंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून आव्हानात्मक प्रवासाला सुरुवात होणार असून २०२६मध्ये टी-२० वर्ल्ड कप व २०२७मध्ये वन-डे वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीरची खरी परीक्षा आतापासूनच सुरू झालीय, असे म्हणायला हरकत नाही.