पर्थ, ता. १८ (पीटीआय) : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताची एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या महान खेळाडूंचे भवितव्य ठरवणारी ही मालिका असणार आहे. त्याच वेळी शुभमन गिल आता व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये कसे नेतृत्व करतो, याकडेही लक्ष असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल सहा महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. यातील रोहित शर्मा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला तेव्हा तो कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात निर्णायक अर्धशतकी खेळी करून त्याने देशाला चॅम्पियन्स करंडक जिंकून दिला आहे. आता कर्णधारपदावरून दूर केल्यामुळे तो केवळ खेळाडू म्हणून उद्या मैदानात उतरेल.