Ind vs Eng Test Cricket : रूटच्या शतकाने इंग्लंडला सावरले ; रांचीच्या खेळपट्टीने वेगळेच रंग दाखवले

मराठीत ज्याला खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे म्हटले जाते त्याचा अनुभव चौथ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशी आला. दिसायला खतरनाक असलेल्या रांचीच्या खेळपट्टीने उपहाराअगोदर वेगळा स्वभाव दाखवला आणि नंतर रंग बदला.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricketsakal

रांची : मराठीत ज्याला खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे म्हटले जाते त्याचा अनुभव चौथ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशी आला. दिसायला खतरनाक असलेल्या रांचीच्या खेळपट्टीने उपहाराअगोदर वेगळा स्वभाव दाखवला आणि नंतर रंग बदला. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या सत्रात पाच बाद ११२ अशा घसरगुंडीनंतर दिवसअखेर सात बाद ३०२ अशी प्रगती केली. बॅझबॉलच्या नादात विचित्र फटके मारून पहिल्या तीन कसोटीत विकेट बहाल करणाऱ्या ज्यो रूटने आज पारंपरिक फलंदाजी केली त्याचे फळ त्याला मिळाले. दिवसअखेर १०६ धावांची शानदार खेळी त्याने साकार केली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या आकाशदीपने सुरुवातीला मिळवलेले तीन विकेट या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्ट ठरले.

सकाळी नऊ वाजता इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्स् याच्या चेहऱ्यावर हसू परतले. कारण होते दोन सामन्यांनंतर अत्यंत महत्त्वाची नाणेफेक तो जिंकला आणि लगेच त्याने फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामना चालू होण्याअगोदर आणि चालू झाल्यावर इंग्लंडचे खेळाडू रांचीच्या खेळपट्टीकडे भयचकित चेहऱ्याने बघत होते. सुरुवातीच्या काही षटकांत काही चेंडू अचानक उसळले तर काही खूप खाली राहिले. पदार्पण करणाऱ्या आकाशदीपने वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर झॅक क्रॉलीची उजवा स्टंप २० फूट लांब फिरायला पाठवला; परंतु तो नो बॉल होता. त्यामुळे चार धावांवर क्रॉलीला जीवदान मिळाले. त्याचाच फायदा घेत क्रॉलीने सिराजला एकाच षटकात १८ धावांचा मार दिला.

आकाशदीप सतत १४०च्या वेगाने मारा करत होता. बेन डकेटला बाद करून त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी मिळवला. ओली पोप पायचित आणि झॅक क्रॉलीला परत एकदा त्रिफळाचीत करून आकाशदीपने चांगलाच ठसा उमटवला. जडेजाचा पुढे पडलेला चेंडू मागे खेळताना कप्तान बेन स्टोक्स् पायचित झाला. नंतर गेल्या तीन सामन्यांत सातत्याने लवकर बाद झालेल्या जॉनी बेअरस्टोने विश्वासाने फटकेबाजी केली. चार चौकार एक खणखणीत षटकार मारून जम बसवलेल्या बेअरस्टोला स्वीपचा फटका मारायचा मोह आवरला नाही. पंचांनी नाबाद ठरवलेला बेअरस्टो टीव्ही पंचांकडे दाद मागितल्यावर अश्विनला पायचित झाला. उपहाराला इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतल्याने रांचीचा कसोटी सामना तीन दिवसांत संपतोय की काय, अशी चर्चा चालू झाली.

चहापानानंतर बेन फोक्सने अश्विनला एकाच षटकात तीन चौकार मारले. त्याच्या पुढच्या षटकात फोक्सला सिराजने वेग बदलून चेंडू टाकून फसवले. ११२ धावांची भागीदारी ४३ षटकांच्या खेळानंतर तुटली.

धावफलक :

इंग्लंड, पहिला डाव : ९० षटकांत ७ बाद ३०२ (झॅक क्रॉली ४२ - ४२ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, बेन डकेट ११, ऑली पोप ०, ज्यो रूट खेळत आहे १०६ - २२६ चेंडू ९ चौकार, जॉनी बेअरस्टॉ ३८ - ३५ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, बेन स्टोक्स् ३, बेन फोक्स् ४७, टॉम हार्टली १३, ऑली रॉबिन्सन खेळत आहे ३१, अवांतर ११. गोलंदाजी ः मोहम्मद सिराज १३-३-६०-३, आकाश दीप १७-०-७०-३, रवींद्र जडेजा २७-७-५५-१, आर. अश्विन २२-१-८३-१, कुलदीप यादव १०-३-२१-०, यशस्वी जयस्वाल १-०-६-०.

दुसऱ्या सत्रात एकही विकेट नाही

फलंदाजीला आल्यापासून ज्यो रूट एकदम तंत्रशुद्ध फलंदाजी करू लागला होता. बेन फोक्स् यानेसुद्धा घाईगडबड न करता खेळणे पसंत केले. एव्हाना रांचीची खेळपट्टी खूप शांत झाली होती. गोलंदाजांनी टाकलेला चेंडू आरामात जात होता. कोणताही धोका न पत्करता दोघे फलंदाज धावा जमा करत होते. ज्यो रूटने अर्धशतक पूर्ण केल्यावर जास्त गाजावाजा न करता परत एकदा पंचांकडून लेग स्टंप आखून घेतली. उपहार ते चहापानादरम्यान दोघांनी भारतीय संघाला एकही यश मिळून दिले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com