Ind vs Eng Test Cricket : भारताला विजयासाठी हव्यात १५२ धावा ; अश्‍विन, कुलदीपचा प्रभावी मारा

ध्रुव जुरेल (९० धावा) याने तळाच्या फलंदाजांसोबत केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी...रविचंद्रन अश्‍विन व कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीची प्रभावी गोलंदाजी...अन्‌ तिसऱ्या दिवसअखेरीस कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांच्या बिनबाद ४० धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
Ind vs Eng Test Cricket
Ind vs Eng Test Cricketsakal

रांची : ध्रुव जुरेल (९० धावा) याने तळाच्या फलंदाजांसोबत केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी...रविचंद्रन अश्‍विन व कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीची प्रभावी गोलंदाजी...अन्‌ तिसऱ्या दिवसअखेरीस कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांच्या बिनबाद ४० धावांच्या भागीदारीच्या जोरावर यजमान भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला आता आणखी १५२ धावांची आवश्‍यकता आहे. या लढतीत विजय मिळवल्यास भारताच्या कसोटी मालिका विजयावरही शिक्कामोर्तब होईल. इंग्लंडला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी दहा विकेट बाद करण्याची आवश्‍यकता आहे.

कसोटी सामना चालू होण्याअगोदर भेगा दिसू लागल्याने दोनही बाजूच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरली होती, तर गोलंदाज जिभल्या चाटत होते. तीन दिवसांचा खेळ झाल्यावर रांची सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे ना कोणाला कौतुक करता येत आहे ना दूषण देता येत आहे. त्याचे कारण असे आहे की, फलंदाजांना गोलंदाज सतत काही ना काही त्रास देत असताना दुसरीकडे ज्यो रूट किंवा ध्रुव जुरेलने सादर केलेली खेळी बघितली की खेळपट्टीत राक्षस दडल्याचे दिसत नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी २७३ धावा जमा झालेल्या दिसल्या, तसेच १३ फलंदाजांनी खालीमानेने तंबूचा रस्ता पकडलेलाही दिसला. तिसऱ्या दिवशीच्या खेळावर संपूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने सामन्यात विजय मिळवायची शक्यता निर्माण केली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू होत असताना भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या उरलेल्या तीन फलंदाजांना किती लवकर बाद करतात याचे विचार डोकावत होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू होत असताना चित्र बरोबर उलटे होते. भारताचे उरलेले तीन फलंदाज किती काळ खिंड लढवतात याची उत्सुकता होती. कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेलने नेमके तेच केले. दोघांनी अत्यंत विश्वासाने गोलंदाजांना रोखून धरले. जुरेलने थोडी नजर बसल्यावर चांगले फटके मारणे चालू केले. इंग्लंडने दुसरा नवा चेंडू घेतला ज्याचा फार परिणाम झाला नाही. वेगवान गोलंदाजांच्या जागी फिरकी गोलंदाज आल्यावर जुरेलने मोठे फटके सहजी मारले. १३१ चेंडू खेळताना कुलदीप यादवने दाखवलेली झगडण्याची तयारी लक्षणीय होती. दोघांच्यातल्या ७६ धावांच्या भागीदारीने इंग्लंडचे मोठी आघाडी घेण्याचे विचार धुळीला मिळाले.

भारताचे वेगवान गोलंदाज फलंदाजीला आल्यावर गरज ओळखून जुरेलने फलंदाजीची शैली बदलली. पहिल्या चार चेंडूंत मोठे फटके मारून शेवटच्या दोन चेंडूंवर एकेरी धाव घेण्याचा सपाटा त्याने लावला. ६ चौकारांपेक्षा जुरेलने मारलेले चार षटकार दणकेबाज होते. ९० धावांवर सर्वात शेवटी जुरेल बाद झाला. शोएब बशीरने ५ फलंदाजांना बाद करून मोठी कामगिरी केली. अपेक्षा मोठी असताना त्यामानाने कमी म्हणजेच ४६ धावांची आघाडी इंग्लंडच्या हाती लागली.

सामन्यात पुनरागमन जोमाने करायला ‍दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना लवकर बाद करणे गरजेचे होते. रोहित शर्माने नवा चेंडू अश्विन जडेजाच्या हाती दिला. अश्विनने पहिल्याच काही षटकांत बेन डकेट, ओली पोप आणि ज्यो रूटला बाद केले. ज्यो रूटला पायचीत दिले गेले, तो रिप्ले बघून टीव्ही पंचांनी दिलेला निर्णय बऱ्याच लोकांना चकित करून गेला. भारतात झालेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घे‍णाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनने ३५० बळींचा टप्पा पार करून अनिल कुंबळेला मागे टाकले.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात झॅक क्रॉली सहजी फटकेबाजी करून पटापट धावा जमा करत होता. रोहितने अश्विनच्या जागी कुलदीपला गोलंदाजीला आणले. कुलदीपने पहिले झॅक क्रॉलीला बोल्ड केले. नंतर कप्तान बेन स्टोक्सला बाद केले. आक्रमक फटके मारून ३० धावा कळायच्या आत जमा करणारा जॉनी बेअरस्टो चहापानानंतरच्या पहिल्याच षटकात बाद झाल्यावर भारतीय खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले. समोरून कुलदीपने टॉम हार्टली आणि ऑली रॉबीन्सनला बाद करून इंग्लंडला अडचणीत आणले. इंग्लंडची एकूण आघाडी २०० धावांच्या आसपास रोखायला भारतीय खेळाडू जिवाचे रान करत होते.अश्विनने दुसऱ्या सत्रात गोलंदाजीला आल्यावर फोक्स आणि जेम्स अँडरसनला झेलबाद करून ५ बळींची नोंद केली व इंग्लंडचा डाव १४५ धावांवर गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. कुलदीप यादवने टिच्चून मारा करताना २२ धावांमध्ये ४ बळी घेतले. विजयासाठी १९२ धावांचे स्पष्ट लक्ष नजरेसमोर ठेवत भारतीय फलंदाज मैदानात उतरले आणि खेळ संपताना ४० धावा जमा करून तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सांगता गोड केली.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड - पहिला डाव ३५३ धावा. भारत - पहिला डाव ३०७ धावा (ध्रुव जुरेल ९०, यशस्वी जयस्वाल, शोएब बशीर ५/११९). इंग्लंड - दुसरा डाव १४५ धावा (झॅक क्रॉली ६०, जॉनी बेअरस्टो ३०, रवीचंद्रन अश्‍विन ५/५१, कुलदीप यादव ४/२२). भारत - दुसरा डाव बिनबाद ४० धावा (रोहित शर्मा खेळत आहे २४, यशस्वी जयस्वाल खेळत आहे १६).

किंग पेअर

पहिला कसोटी सामना इंग्लंडला जिंकून देताना अफलातून खेळी करणाऱ्या ऑली पोपच्या फलंदाजीला नंतरच्या तीन कसोटींत चांगलेच ग्रहण लागले आहे. रांची कसोटीत पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या पोपला अश्विनने ‍दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बाद करून धमाल उडवली. दोनही डावात शून्यावर बाद होण्याच्या प्रकाराला क्रिकेटच्या भाषेत ‘किंग पेअर’ म्हटले जाते. फलंदाजाला कधी नशीब जोरदार साथ देते तर कधी क्रिकेट असा राग काढते की वीस धावा करणेही दुरापास्त होते. त्याचाच प्रत्यय रांचीच्या मैदानावर ओली पोपला बघताना आला.

ध्रुव जुरेलने डाव सावरला

भारतीय संघ पहिल्या डावात चांगलाच अडचणीत सापडला असताना दुसरा कसोटी सामना खेळणारा ध्रुव जुरेल कामी आला. जुरेलने सर्व इंग्लिश गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करताना प्रथम कुलदीप यादवबरोबर ७६ आणि नंतर आकाशदीपबरोबर ४० धावांची भागीदारी केली. जुरेलचे शतक १० धावांनी हुकले तेव्हा सामना बघणारे हळहळले. पॅव्हेलियनमध्ये परत येताना भारतीय संघ जुरेलसाठी उभे राहून टाळ्या वाजवताना दिसला. ज्यावरून त्याच्या खेळीचे महत्त्व अजून पटले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com