T20 World Cup 2024 : भारतीय संघ विजयासह अव्वल आठ संघांत;सौरभ नेत्रावळकरकडून विराट, रोहितच्या विकेट

अर्शदीप सिंग (४/९) व हार्दिक पंड्या (२/१४) यांची प्रभावी गोलंदाजी व सूर्यकुमार यादव (नाबाद ५० धावा), शिवम दुबे (नाबाद ३१ धावा) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्‍वकरंडकातील अ गटातील लढतीत अमेरिकन संघावर सात विकेट राखून विजय मिळवला.
T20 World Cup 2024
T20 World Cup 2024sakal

न्यूयॉर्क, : अर्शदीप सिंग (४/९) व हार्दिक पंड्या (२/१४) यांची प्रभावी गोलंदाजी व सूर्यकुमार यादव (नाबाद ५० धावा), शिवम दुबे (नाबाद ३१ धावा) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्‍वकरंडकातील अ गटातील लढतीत अमेरिकन संघावर सात विकेट राखून विजय मिळवला. सलग तिसऱ्या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश केला. मुंबईकर असलेला पण अमेरिकन संघाकडून खेळत असलेल्या सौरभ नेत्रावळकर याने विराट कोहली (०) व कर्णधार रोहित शर्मा (तीन धावा) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवून चमक दाखवली.

विजयासाठी १११ धावा काढायच्या निर्धाराने मैदानात उतरल्यावर भारतीय संघाची सुरुवात धक्कादायक झाली. सौरभ नेत्रावळकरने विराट कोहलीला शून्यावर आणि पाठोपाठ रोहित शर्माला बाद करून मजा आणली. चांगली फलंदाजी करीत असलेल्या रिषभ पंतला सरपटी चेंडूने बाद केले. पहिल्या दहा षटकांत तीन बाद ४७ धावा जमा झाल्या होत्या, ज्यावरून अमेरिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर आणलेले दडपण कळू शकेल. मधूनच चेंडू खूप खाली राहत असल्याने धावा जमा करणे कठीण वाटत असताना सूर्यकुमारचा झेल नेत्रावळकरने सोडला. त्यावेळी सात षटकांत ५१ धावा अजून करायच्या बाकी होत्या. संघाला गरज असताना सूर्यकुमार आणि शिवम दुबेची जोडी जमली. दोघांनी पळून धावा काढताना मधूनच मोठा फटका मारला. अमेरिकन संघाने दोन षटकांदरम्यान खूप वेळ घेतल्याने दंड बसून भारतीय संघाला पाच अतिरिक्त मोलाच्या धावा मिळाल्या. १७व्या षटकात सूर्यकुमारने ठेवणीतील फटके मारले. दोघांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी सामन्याअगोदर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा मोठ्या प्रेमाने सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंगला भेटताना दिसले. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामना चालू झाल्यावर पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने शायन जहांगिरला पायचित केले आणि शेवटच्या चेंडूवर अँड्रियस गौसला बाद केले. मोनांक पटेलच्या जागी कप्तानी करणारा ॲरोन जोन्सने सिराजला षटकार मारून आपण मनमोकळा खेळ करणार असल्याचे जाहीर केले.

ॲरोन जोन्सला कमी वेगाचा आखूड टप्प्याचा चेंडू टाकून हार्दिक पंड्याने चकवून झेलबाद करवले. सलामीला फलंदाजीला आलेला स्टीव्हन टेलर एका बाजूने चांगली फलंदाजी करत होता. २४ धावांवर खेळणाऱ्या टेलरला अक्षर पटेलने बाद केले. नितीश कुमारने २७ धावा करताना मारलेले काही फटके प्रेक्षकांना खूश करून गेले. हार्दिक पंड्याने टाकलेल्या बाऊन्सरवर षटकार मारताना नितीश चुकला ते केवळ त्याबाजूची सीमारेषा लांब होती म्हणून. सिराजने नितीशचा पकडलेला झेल अफलातून होता.

टाकलेल्या प्रत्येक षटकात अर्शदीप सिंगने भेदक मारा करून फलंदाजांना बाद करायचा सपाटा लावला होता. अमेरिकन धावफलकाला त्याच कारणाने बाळसे धरले नाही. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने मिळून सहा फलंदाजांना बाद केल्याने २० षटकांच्या अखेरीला अमेरिकन धावफलक आठ बाद ११० धावांवर रोखला गेला.

संक्षिप्त धावफलक : अमेरिका - २० षटकांत आठ बाद ११० धावा (स्टीव्हन टेलर २४, नितीशकुमार २७, कोरे अँडरसन १५, अर्शदीप सिंग ४/९, हार्दिक पंड्या २/१४) वि. भारत - १८.२ षटकांत तीन बाद १११ धावा (रोहित शर्मा ३, विराट कोहली ०, रिषभ पंत १८, सूर्यकुमार यादव नाबाद ५०, शिवम दुबे नाबाद ३१, सौरभ नेत्रावळकर २/१८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com