
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
दुबई : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाचा उपांत्य सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रेक्षक, पत्रकार, खेळाडू सगळे लोक खूश होते. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलायला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला. सगळ्यांना अपेक्षा होती की मुख्य प्रशिक्षकही खूश असणार आणि पत्रकार परिषद रंग भरणार. झाले उलटे, कारण गौतम एकदम गंभीर होऊन पत्रकार परिषदेला आला आणि प्रत्येक प्रश्नाला एकदम कडक शब्दात उत्तर देताना प्रश्न विचारणाऱ्याचा दृष्टिकोन कसा चूक आहे, अशा थाटात बोलत होता. थोडक्यात गौतम गंभीर जणू काही अँग्री यंग मॅन बनून पत्रकारांना भेटायला आला होता. म्हणून सामन्यातल्या चांगल्या खेळाचा आनंद त्याने व्यक्त केला नाही. पत्रकारांना काही कळत नाही. त्यांच्या प्रश्नांमधून काहीतरी वादंग निर्माण करायचा प्रयत्न केला जाणार आहे, असा पूर्वग्रहदूषित विचार मनात घेऊन गौतम पत्रकारांना सामोरा गेला. परिणामी पत्रकार परिषद संपल्यावर सगळे पत्रकार केवळ एकच प्रश्न एकमेकांना विचारत होते की, जिंकल्यावरही गौतम ‘गंभीर’ का?