अमेरिकन टेनिस : नवख्यांचा खेळ बघून मातब्बर झाले अवाक्!

US-open-2019
US-open-2019

ऑलिंपिकसह बहुतेक सांघिक खेळांमध्ये दर चार वर्षांनी येणाऱ्या जागतिक स्पर्धांमधून स्थित्यंतर घडते. टेनिसच्या एका मोसमात चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात आणि त्यात लागणाऱ्या निकालांनुसार खेळ कोणत्या दिशेने सरकतो आहे, याचे चित्र दिसते. सध्या पुरुष आणि महिला टेनिसमध्ये ही प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे.

पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्स यांच्या कारकिर्दीची तिन्हीसांज झाली आहे. फेडरर 38, तर सेरेना 37 वर्षांची आहे. पुरुषांमध्ये फेडररचे प्रमुख प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच दुखापतींमधून मार्गक्रमण करीत आहेत. दोन्ही गटांत नव्या पिढीची प्रामुख्याने तज्ञांना आणि चाहत्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे.

दिग्गजांची पिढी मात्र 'जुने ते सोने' उक्ती सार्थ ठरविते आहे. या पार्श्‍वभूमीवर सेरेनाने मातृत्वानंतर गेल्या दोन मोसमांत चार वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिला विंबल्डनमध्ये गतवर्षी जर्मनीची अँजेलिक केर्बर, यंदा रुमानियाची सिमोना हालेप आणि गतवर्षी अमेरिकन स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका यांनी हरविले. या तिघींच्या तुलनेत बियांका आंद्रीस्क्‍यू सर्वाधिक अनपेक्षित आहे. ती केवळ 19 वर्षांची आहे.

अँजेलिक विजेती बनण्यापूर्वी उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत प्रत्येकी दोन वेळा हरली. सिमोना तर उपांत्यपूर्व फेरीत पाच, उपांत्य व अंतिम फेरीत प्रत्येकी दोन वेळा हरली. नाओमी ओसाकाने पहिल्याच फायनलमध्ये सेरेनाला शह दिला, पण त्याआधी ती दहापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. अशावेळी चारच स्पर्धांत आणि आधीच्या तीन प्रयत्नांत दुसऱ्या फेरीच्यापुढे मजल मारता आली नसताना बियांका विजेती ठरली.

सेरेनाला 38 वय सुरू आहे, ती मातृत्वाच्यावेळी प्रकृतीमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर पुनरागमन करते आहे. हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आणि ती सहजी हार मानत नाही हे पाहता तिलाही दाद द्यायला हवी. 

पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम, ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास, जर्मनीचा अलेक्‍झांडर झ्वेरेव असे खेळाडू 'टॉप थ्री'समोर सक्षम आव्हान निर्माण करू शकत नसताना रशियाच्या डॅनील मेदवेदेव याच्या रूपाने अनपेक्षित पर्याय निर्माण झाला. सेरेनाप्रमाणेच नदालसुद्धा वाढते वय आणि वाढत्या दुखापतींचा निर्धाराने सामना करतो आहे. यानंतरही त्याने यंदा चार पैकी तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांत अंतिम फेरी आणि दोन विजेतीपदे अशी कामगिरी केली आहे. त्याला सलाम करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com