
Deandra Dottin : WPL मध्ये भुताटकी; वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडूला रात्रीत घरी पाठवलं, काय आहे गौडबंगाल?
Deandra Dottin Ghost Tweet : वुमन्स प्रीमियर लीगची (Women's Premier League) सुरूवात आजपासून (दि. 4) मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाली. पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. मात्र सामन्यापूर्वीच गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला. त्यांची अष्टपैलू खेळाडू डेएन्ड्रा डॉटिन WPL मधून बाहेर पडली. गुजरातने याचे कारण दुखापत असे सांगितले मात्र डॉटिनच्या ट्विटमुळे एक वेगळेच आणि अविश्वसनीय कारण पुढे येत आहे.
गुजरात जायंट्सने डॉटिन दुखापतीमुळे WPL मधून बाहेर पडल्याचे सांगितले. मात्र हे प्रकरण वेगळेच असल्याचे दिसत आहे. डॉटिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले. ती म्हणाली की मी पूर्णपणे ठीक आहे. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते, 'मला जे मेसेज मिळत आहेत त्याबद्दल आभारी आहे. मात्र सत्य हे आहे की मी भूतबाधेतून बरी होत आहे.'
डॉटिंनच्या या वादग्रस्त आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ट्विटने एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. गुजरातने डॉटिनला WPL लिलावात 60 लाख रूपये देऊन खरेदी केले होते. गुजरातने आता डॉटिनच्या जागी आता किम ग्राथला आपल्या संघात सामील केले आहे. फ्रेंचायजीने याबाबतची माहिती ट्विट करून दिली.