दिपा मलिकने जिंकली मने; क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

 पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती. देशातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोत्तम "खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दीपा पहिली वयस्क आणि महिला दिव्यांग खेळाडू ठरली. मात्र, या सोहळ्यास दुसरा विजेता बजरंग पुनिया परदेशात असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही. 

नवी दिल्ली : पॅरालिंपिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे मध्यावर्ती आकर्षण ठरली होती. देशातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोत्तम "खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दीपा पहिली वयस्क आणि महिला दिव्यांग खेळाडू ठरली. मात्र, या सोहळ्यास दुसरा विजेता बजरंग पुनिया परदेशात असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही. 

राष्ट्रीय क्रीडा दिनी आज राष्ट्रपती भवनातील अशोका सभागृहात झालेल्या खास सोहळ्यात देशातील क्रीडा गुणवत्तेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

रिओ 2016 पॅरालिंपिकमध्ये गोळा फेकी मधील एफ 53 या प्रकारात रौप्यपदक विजेती दीपा मलिक हिला गौरविण्यात आले तेव्हा अशोका सभागृहातील प्रत्येकाने उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिच्या कामगिरीचे कौतुक केले. आपल्या अजोड कामगिरीने या क्षणापर्यंत आलेल्या दीपाने उपस्थितांची मने जिंकली. त्याचवेळी आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीतील सुवर्ण विजेता बजरंग पुनिया सरावासाठी रशियात असल्याने उपस्थित राहू शकला नाही. 

अखेर माझे पदक आणि कामगिरी "खेळ रत्न'साठी ग्राह्य धरण्यात आली. दिव्यांग खेळाडूंच्या अडचणी पुरस्कार समितीला समजल्या हे महत्त्वाचे. पॅरालिंपिकमध्ये आम्ही केवळ दिव्यांग व्यक्तींचे नाही, तर देशाचे प्रतिनिधीत्व करतो. देशाचा तिरंगा मानाने फडकाविण्यात आमचा हातभार लागला याशिवाय दुसरी अभिमानाची गोष्ट असू शकत नाही. 
-दिपा मलिक

"खेल रत्न' पुरस्कार मिळविणारी दिपा ही पहिली महिला पॅरा खेळाडू ठरली. अर्थात, या पुरस्कारासाठी पात्र ठरलेली ती दुसरी दिव्यांग खेळाडू आहे. यापूर्वी देवेंद्र झाझरिया याला 2017 मध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यापूर्वी दिपाला तीनवेळा या पुरस्कारासाठी डावलण्यात आले तेव्हा पुरस्कार समितीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. 

पुरस्कार सोहळ्यानंतर दिपा म्हणाली,"मी खूप आनंदी आहे. माझा पुरस्कारापर्यंतचा सगळा प्रवास हा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा ठरेल याचा मला विश्‍वास आहे. त्याचबरोबर दिव्यांग खेळाडूंना या पुरस्काराने नक्कीच प्रेरणा मिळेल.पॅरालिंपिकमध्ये तब्बल 70 वर्षांनी भारताला हे पदक मिळवून दिले याचा मला सार्थ अभिमान आहे.'' 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती बी, साईप्रणित, महिला क्रिकेटपटू पूनम यादवस आशियाई सुवर्णपदक विजेती हेप्टॅथलॉन खेळाडू स्वप्ना बर्मन , फुटबॉलपटू गुरप्रीत सिंग, दोनवेळा जागतिक रौप्यपदक विजेती बॉक्‍सिंग खेळाडू सोनिया लाथर, अश्‍वारोहणातील आशियाई रौप्यपदक विजेता फौझाद मिर्झा, मोटोरस्पोर्टसमधील गौरव गिल आणि कबड्डी कर्णधार अजय ठाकूर यांच्यासह एकूण 19 क्रीडापटूंना आज राष्ट्रपतींच्या हस्ते "अर्जुन' क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. याचबरोबर राष्ट्रपतींच्या हस्ते "द्रोणाचार्य', "ध्यानचंद जीवनगौरव', तेनसिंग नॉर्गे साहस पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार आणि राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. 

"खेल रत्न'साठी रोख 7.5 लाख रुपये आणि स्मृती पदक, "अर्जुन'साठी रोख 5 लाख आणि महान योद्धा अर्जुनाचा ब्रॉंझचा पुतळा असे पुरस्काराचे स्वरुप होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepa Malik receives Khel Ratna Award