अखेरपर्यंत नाही गवसली लिलीला "कप'ची गुरुकिल्ली

मुकुंद पोतदार
गुरुवार, 18 जुलै 2019

- ऑस्ट्रेलियाचे एक काळ गाजविलेले विश्वविक्रमी गोलंदाज डेनिस लिली यांचा आज 70वा वाढदिवस.

- त्यानिमित्त त्यांच्याविषयी वर्ल्ड कप आणि वन-डे क्रिकेटच्या संदर्भातील भाष्य.

ऑस्ट्रेलियाचे एक काळ गाजविलेले विश्वविक्रमी गोलंदाज डेनिस लिली यांचा आज 70वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्याविषयी वर्ल्ड कप आणि वन-डे क्रिकेटच्या संदर्भातील भाष्य.

वर्ल्ड कपमध्ये फलंदाज किती वेगाने धावा करतात याबरोबरच आणखी एका गोष्टीविषयी कमालीची उत्सुकता होती आणि ती म्हणजे गोलंदाज त्यांना कसे रोखतात? तो काळ गाजविलेल्या प्रतिभाशाली गोलंदाजांकडून अर्थातच अपेक्षा होत्या. यातील आघाडीचे नाव म्हणजे डेनिस लिली. तुफानी वेग, तशीच आक्रमकता आणि प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीतपट करण्याची जिगर दाखविणारा डेनिस लिली समोरील फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरायचा, हे चित्र कसोटीत नवे नव्हते.

त्याला वेगवान गोलंदाजीचा "गुरू' म्हटले जाते; पण वन-डेच्या "कसोटी'त मात्र दोन स्पर्धांत खेळूनही लिलीला अखेरपर्यंत गुरुकिल्ली गवसली नाही. वेस्ट इंडीजच्या आल्विन कालिचरण याच्यासारख्या दुसऱ्या फळीतील फलंदाजाने डेनिस लिलीवर तोफ डागून त्याचा खातमा करणे आणखी धक्कादायक ठरले.

75च्या स्पर्धेपूर्वी कांगारूंनी कालिचरणला "टार्गेट' केले होते. याची गटसाखळीत कालिचरणने सव्याज परतफेड केली. दहा चेंडूंत त्याने 35 धावा फटकावताना 4-4-4-4-4-1-4-6-0-4 असा धडाका लावला. अखेरीस लिलीनेच कालिचरणला बाद केले; पण तोपर्यंत कांगारूंचा पराभव नक्की झाला होता. यानंतर योगायोगाने हेच दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले. तेव्हासुद्धा लिलीने घोर निराशाच केली. नव्या चेंडूवरील गॅरी गिल्मोर याच्यासारखा नवखा जोडीदार पाच विकेट टिपत असताना लिलीला केवळ एक बळी मिळविता आला आणि त्यासाठी 55 धावांचे मोल द्यावे लागले.

फलंदाजीत लिलीने दिलेली झुंज व्यर्थ ठरली. 83च्या स्पर्धेत लिली चार सामन्यांत चारच विकेट घेऊ शकला आणि त्याची सरासरी 44.25 धावांची होती. विंडीजविरुद्ध गटातील शेवटच्या सामन्यात त्याला 52 धावांत एकही विकेट मिळविता आली नाही. लिलीने तेथेच वन-डेमधून निवृत्ती जाहीर केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denis Lili turns 70 today