ICCच्या एलिट पंचांमध्ये वादग्रस्त धर्मसेना कायम तर रवी यांना डच्चू 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी ओव्हर थ्रोच्या नियमांचा विसर पडलेले आणि त्यामुळे सामन्याचा निकालच बदलले श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे एलिच पॅनेलमधले स्थान आयसीसीने कायम ठेवले, मात्र दोन नव्या पंचांचा समावेश करताना भारताच्या सुंदराम रवी यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

मुंबई : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी ओव्हर थ्रोच्या नियमांचा विसर पडलेले आणि त्यामुळे सामन्याचा निकालच बदलले श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे एलिच पॅनेलमधले स्थान आयसीसीने कायम ठेवले, मात्र दोन नव्या पंचांचा समावेश करताना भारताच्या सुंदराम रवी यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

आयसीसीने 2019-20 या वर्षासाठी एलिट पॅनेलच्या 12 पंचांची नियुक्ती जाहीर केली. गतवेळच्या यादीतील इयन गुल्ड हे पंच विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातून निवृत्त झाले. त्यामुळे एक जागा रिकामी झाली होती. परंतु आयसीसीने इंग्लंडच्या मिशेल गॉफ आणि वेस्ट इंडीजच्या ज्युएल विल्सन या दोघांची नियुक्ती करताना भारताच्या सुंदराम रवी यांची जागा रिकामी केली. 

धर्मसेना यांचा आढावा घेतला? 
आयसीसीच्या पंच निवड समितीने वार्षिक फेरआढव्यानंतर पंचांची यादी जाहीर केली, असे सांगण्यात आले, परंतु विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नियमचा विसर पडलेल्या धर्मसेना यांच्या कामगिरीचा आढावा घेतला का? अशी विचारणा क्रिकेट वर्तुळात करण्यात येऊ लागली आहे. सर्वश्रेष्ठ आणि अनुभवी माजी पंच सायमन टॉफेल यांनी इंग्लडंच्या बेन स्टोक्‍सला ओव्हर थ्रोच्या चार धावा देणे चुकीचे होते असे जाहीर मत व्यक्त केले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर धर्मसेना यांनी चुक मान्य केली, परंतु दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला होता. 

वर्ल्डकपमध्ये रवी होते पंच 
संपूर्ण विश्‍वकरंडक स्पर्धेत धर्मसेना यांचे अनेक निर्णय चुकत होते, खेळाडू "डीआरएस'चा वापर करत असल्याने धर्मसेना यांनी दिलेला निर्णय बदलावा लागत होता. विश्‍वकरंडक स्पर्धेत एस. रवी यांनी सुद्धा काही सामन्यात पंचगिरी केली होती. 

नव्याने नियुक्ती करण्यात आलेले गॉफ आणि विल्सन हे अनुभवी पंच असल्याचे आयसीसीने आपल्या प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. एलिट पॅनेलमध्ये येण्याअगोदर गॉफ यांनी 59 कसोटी आणि 14 ट्‌वेन्टी-20 सामन्यात तर विल्सन यांनी 13 कसोटी, 63 एकदिवसीय आणि 26 ट्‌वेन्टी-20 सामन्यात पंचगिरी केलेली आहे. 

एलिट पॅनेलमधील पंच ही फारच आव्हानात्मक जबाबदारी आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे करोडो क्रिकेट प्रेमी मुल्यांकन करत आहे. कामगिरीवरूनच त्यांची आम्ही नियुक्ती करत असतो. 
-ऍड्रियन ग्रिफिथ, आयसीसीचे पंच, रेफ्री समिती व्यवस्थापक 

श्रीनाथ एकमेव भारतीय सामनाधिकारी 
आयसीसीने पंचांबरोबर सामनाधिकाऱ्यांचीही यादी जाहीर केली त्यात माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे एकमेव भारतीय आहेत. ही यादी अशी आहे : डेव्हिड बून, ख्रिस ब्रॉड, जेफ क्राऊन, रंजन मदुगले, अँडी पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डस्‌न आणि जवागल श्रीनाथ. 

एलिट पॅनेलमधील पंच : अलीम दार, कुमार धर्मसेना, मार्सिस इरासमस, ख्रिस गॅफनी, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड कॅटेलबर्ग, निगेल लॉंग, ब्रुस ऑक्‍सेनफोर्ड, पॉल रायफल आणि रॉड टकर. 

सुंदराम रवीही चुकले होते तेव्हा.. 
यंदाच्या आयपीएलमध्ये अखेरच्या चेंडूवर निकाल लागलेल्या मुंबई-बंगळुर यांच्यातील साखळी सामन्यात मलिंगाने टाकलेला तो अखेरचा चेंडू नोबॉल असल्याचे रवी यांना समजले नव्हते त्यानंतर बंगळुर संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharmasena indcluded in ICC elite panel