esakal | मतभेद हेच मला वगळण्याचे कारण - पेस
sakal

बोलून बातमी शोधा

मतभेद हेच मला वगळण्याचे कारण - पेस

मतभेद हेच मला वगळण्याचे कारण - पेस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूर - डेव्हिस करंडक स्पर्धेच्या 27व्या वर्षाच्या कारकिर्दीत संघात प्रथमच वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेस संतापला असून, त्याने कर्णधार महेश भूपतीवर संघ निवड निकषांचे उल्लंघन केल्याची टीका केली आहे.

उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी वगळण्यात आल्यानंतर पेस म्हणाला, 'भूपती आणि माझ्यातील बिघडलेले संबंध हेच मला वगळण्यामागील मुख्य कारण आहे. मला वगळण्यामागे कुठलेही ठोस कारण नाही. त्याने संघ निवड निकषांचे उल्लंघन केले आहे.''

पेस फॉर्ममध्ये नसल्याचे आणि सरावास उशिरा आल्याचे कारण कर्णधार भूपतीने दिले आहे. वास्तविक गेल्याच आठवड्यात पेसने मेक्‍सिको येथील चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. पेस म्हणाला, ""मी स्पर्धा खेळत असल्यामुळे उशिराने सरावासाठी दाखल झालो. तेव्हा माझ्याकडून चांगला खेळ होत होता. फॉर्म हाच जर संघ निवडीचा निकष असेल, तर माझे विजेतेपद फॉर्म दाखविण्यासाठी पुरेसे आहे. मुख्य म्हणजे फॉर्म हा काही कायम नसतो. तो सतत बदलत असतो. याचा विचार संघ निवडताना व्हायला हवा होता.''

कर्णधार या नात्याने संघ निवडीचा अधिकार भूपतीला आहे यात शंकाच नाही. पण, वैयक्तिक मतभेदावरून माझ्यावर अन्याय केला, तसा भविष्यात अन्य कुणावर करू नकोस, असा सल्ला देखील पेसने दिला.
भारतीय संघातून वगळल्यामुळे पेस चांगलाच संतापलेला होता. तो म्हणाला, 'मला मेक्‍सिकोवरून फोन करून संघातून वगळण्यासाठीच बोलावण्यात आले का? मला वगळल्याचा निरोप ते फोनवरूनही देऊ शकत होते. इतकी वर्षे खेळल्यानंतर अशी वागणूक मिळावी हे खेदजनक आहे. देशाविषयी आणि खेळाविषयी प्रेम असल्यामुळे मी मेक्‍सिकोवरून येथे तातडीने हजर झालो.''

भविष्याविषयी बोलताना पेस म्हणाला, 'एकदा वगळले म्हणून माझे टेनिस आणि देशाविषयीचे प्रेम कमी होणार नाही. वैयक्तिक पातळीवर मी जरूर निराश आहे. पण, त्याचा खेळावर परिणाम होऊ देणार नाही. मी मेहनत घेतच राहणार. मला खात्री आहे, एक दिवस माझा हाच ध्यास मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळवून देईल.''

व्यावसायिक टेनिसपटू असलो, तरी जेव्हा देशासाठी खेळण्याचा प्रसंग येतो तेव्हा माझे प्राधान्य देशाकडूनच खेळायला असते. मला माझ्या कारकिर्दीकडे आणि मानांकनाकडे लक्ष द्यायचे असते, तर मी मेक्‍सिकोहून येथे आलोच नसतो.
- लिअँडर पेस