अव्वल आव्हानवीर 

Virat Kohli
Virat Kohli

अद्वितीय क्षमतेचे खेळाडू अतुलनीय कामगिरी करतात, तेव्हा मैदानावर त्यांच्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नसतो. त्यांना कामगिरीतील सातत्याचा, फॉर्मचा, कौशल्याचा, तंदुरुस्तीचा, प्रतिभेचा फायदा होतो. अशा चॅंपियनकडे परिस्थितीला सामोरे जाण्याची, आव्हानावर मात करण्याची, सामना जिंकून देण्याची जिद्द असते. विराट कोहली हा असाच अव्वल आव्हानवीर आहे! 

विराट कोहलीने शतकांच्या अर्धशतकाचा माइलस्टोन गाठला आहे. त्याची ही कामगिरी विश्‍वविक्रमी नसली, तरी अफलातून आहे यात दुमत नाही. मी बीसीसीआयच्या राष्ट्रीय गुणवत्ता शोध समितीचा (नॅशनल टॅलेंट हंट कमिटी) प्रमुख होतो. मी 16 वर्षांखालील तसेच 19 वर्षांखालील स्पर्धांत त्याचा खेळ पाहिला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियातील उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी (इमर्जिंग प्लेअर्स टूर्नामेंट) संधी दिली. तेव्हा मी राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष होतो. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी केली ती उच्च दर्जाची आणि क्षमतेची चुणूक दाखविणारी होती. त्यानंतर त्याच्या निवडीसाठी मी विलंब लावला नाही. 

ऑस्ट्रेलियातील त्या स्पर्धेपासून मी विराटच्या कारकिर्दीचे बारकाईने अवलोकन करत आहे. त्याच्या वाटचालीत कोणता मुद्दा निर्णायक ठरला आहे, याविषयी मी सुरवातीलाच भाष्य करू इच्छितो. खेळाडूंची कारकीर्द भरात असते, ते तरुण रक्ताचे असताना काही गोष्टी सहज साध्य होतात; मात्र आणखी वरची पायरी गाठायची असल्यास तंदुरुस्तीला (फिटनेस) महत्त्व असते. आजच्या झटपट क्रिकेटच्या युगात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विराटला हे फार लवकर उमगले. त्याने खाण्या-पिण्यावर विलक्षण नियंत्रण ठेवले. तो केवळ निवडक पदार्थ ठराविक प्रमाणात खातो. तरुण वयात त्याने कमालीची तंदुरुस्ती कमावली. सचिन तेंडुलकर सरावाच्या जोडीला तंदुरुस्तीसाठी मेहनत घ्यायचा. विराटही त्याचा कित्ता गिरवत आहे. 

तंदुरुस्तीचा वस्तुपाठ 
तंदुरुस्तीमुळे विराट शंभर-दीडशे-दोनशे धावा झाल्यावरही थकल्यासारखा वाटत नाही. आधीच्याच गतीने आणि लयीत धावा करण्याची क्षमता त्याने आत्मसात केली, ती केवळ तंदुरुस्तीच्या जोरावर. त्यामुळे तो धावांची गतीही वाढवू शकतो. सर्वोच्च पातळीवर देशाचे-संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडे कौशल्य (स्किल) आणि गुणवत्ता (टॅलेंट) असतेच. आजच्या युगात महत्त्व प्राप्त झाले आहे ते तंदुरुस्तीला. याबाबतीत मी माझ्या ऍकॅडमीतील मुलांना विराटचे उदाहरण अगदी दररोज देतो. 
सर्वोच्च पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे दृष्टिकोन (टेम्परामेंट). निवड समिती अनेक खेळाडूंना संधी देते, त्यात संधीचे सोने करून अशी सोनेरी कारकीर्द घडविणारे किती जण असतात, असा प्रश्न विचारून बघा. तुम्हाला डोके फार खाजविण्याची गरज पडणार नाही व हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच नावे समोर येतील. तुम्ही खेळाडूंना संघात निवडल्यावर तो प्रत्यक्ष मैदानावर कशी कामगिरी करेल, याविषयी तुम्ही नेमकेपणाने काहीच सांगू शकत नाही. तो किती मजल मारेल याविषयीसुद्धा काही सांगता येत नाही. सचिन, धोनी, विराट असे खेळाडूच संधीचे सोने करू शकतात. 

विराटसारख्या खेळाडूंवर वेगवेगळ्या प्रकारचे दडपण असते. संघाची मदार त्यांच्यावर असतेच, त्याचबरोबर साऱ्या देशाला त्यांच्याकडून अपेक्षा असतात. त्यांच्यावर असंख्य प्रकारची दडपणे (प्रेशर्स) असतात. अशा परिस्थितीला असे दिग्गज कसे सामोरे जातात, असे कोडे अनेकांना पडते. याचे उत्तर असे आहे, की हे टॉपचे खेळाडू मैदानावर उतरताच एका कक्षेत जातात. यास खेळाच्या परिभाषेत "झोन'मध्ये जाणे, असे संबोधले जाते. विराट खेळपट्टीवर उतरून स्टान्स घेऊन पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यापूर्वी अशाच झोनमध्ये गेलेला असतो. त्याचा खेळ पाहताना हे अगदी ठळकपणे आणि सहजपणे जाणविल्याशिवाय राहत नाही. 

विक्रमादित्याच्या दिशेने... 
अद्वितीय क्षमतेचे खेळाडू अतुलनीय कामगिरी करतात, तेव्हा मैदानावर त्यांच्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नसतो. त्यांना कामगिरीतील सातत्याचा, फॉर्मचा, कौशल्याचा, तंदुरुस्तीचा, प्रतिभेचा फायदा होतो. अशा चॅंपियनकडे परिस्थितीला सामोरे जाण्याची, आव्हानावर मात करण्याची, सामना जिंकून देण्याची जिद्द असते. विराट हा तर अव्वल आव्हानवीर आहे. विराटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्वतःच्या कामगिरीविषयी कमालीचा अभिमान वाटतो. आपला खेळ एका विशिष्ट उंचीवर झाला पाहिजे, अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधलेली असते. त्यासाठीच तो तंदुरुस्ती भक्कम करण्यासाठी दिवसामागून दिवस, आठवड्यांमागून आठवडे मेहनत (हार्डवर्क) करत राहतो. त्याची एकाग्रता साधण्याची क्षमतासुद्धा विलक्षण आहे. 
विराटसारखा खेळाडू अर्जुनसारखा असतो. तीर ताणून नेम धरल्यावर अर्जुनाला जसा फक्त डोळाच दिसतो, तसेच विराटचे आहे. गार्ड घेऊन स्टान्स घेताच त्याच्यातील अव्वल आव्हानवीराला केवळ आणि केवळ चेंडूच दिसतो. 

विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगला खेळ करतो. प्रत्येक सामन्यात, प्रत्येक डावात सर्वोत्तम कामगिरी व्हावी म्हणून तो पुरेपूर गांभीर्याने तयारी करतो. त्याच्याकडून संघाच्या, देशाच्याच नव्हे, तर जगाच्याही अपेक्षा असतात. त्या सदैव राहतील, कारण त्याने तसा दर्जा राखत कामगिरी करून दाखविली आहे. विराट आणखी किती घोडदौड करेल आणि क्रिकेटच्या इतिहासात तो किती उच्च स्थान मिळवेल याचे भाकीत वर्तविणे खरोखरच अवघड आहे. याचे कारण तो ज्या पद्धतीने खेळतो हे ते पाहता तो अनेक विक्रम मोडेल यात शंका नाही. या विक्रमांची व्याप्ती किती असेल, याची कल्पना करणे अवघड आहे. एक मात्र नक्की की क्रिकेटच्या इतिहासामधील त्याचे स्थान फार मोठे असेल. तो तरुण आहे. तो बराच काळ खेळेल. 

विराट किती विक्रम करेल यापेक्षा तो भारताला अनेक सामने जिंकून देईल आणि ते जास्त महत्त्वाचे असेल. आगामी काळात त्याच्यासमोर काय आव्हान असेल, तर आता वर्षाअखेर सुरू होणारा दक्षिण आफ्रिका दौरा आणि त्यानंतरचा इंग्लंड दौरा. यातही इंग्लंड दौरा मोलाचा असेल, कारण मागील दौऱ्यात आपण 0-4 हरलो. त्यात विराट अपयशी ठरला. त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. यामुळे तो या वेळी इंग्लंड दौऱ्यासाठी सुसज्ज आणि सुसंघटित होऊनच खेळेल. याचे कारण तो अव्वल आव्हानवीर आहे. 
(शब्दांकन : मुकुंद पोतदार) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com