
वर्षीय दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हंपीवर विजय मिळवून बाटुमी, जॉर्जिया येथे झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचा ‘दिव्य’ पराक्रम केला. टायब्रेकमधील दुसऱ्या डावात हंपीने पराभव मान्य केला आणि १९ वर्षीय दिव्या देशमुखला आपले आनंदाश्रू अनावर झाले. तेथे हजर असणाऱ्या तिच्या आईने दिव्याला कवेत घेऊन आपला मनात न मावणारा आनंद व्यक्त केला. अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल पद्धतीचे डाव जेव्हा बरोबरीत सुटले, तेव्हा नियमानुसार जलद गती (रॅपीड) सामन्यात स्पर्धेचे विजेतेपद ठरणार हे निश्चित झाले. त्यामुळे सध्याची जलद गती जगज्जेती असलेल्या कोनेरू हंपीचे पारडे या लढतीत जड वाटू लागले होते.